NTPC : सलग 32 व्या वर्षी परंपरा जपली, एनटीपीसीकडून 2424 कोटींच्या लाभांशाचं वाटप, वर्षभरात 8000 कोटींचा टप्पा पूर्ण
NTPC : महारत्न कंपनी एनटीपीसीनं प्रतिशेअर 2.5 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लाभांशाची रक्कम शेअरधारकांना देण्यात आली आहे.

मुंबई : महारात्न एनटीपीसी कंपनीनं मार्चमध्ये संपणाऱ्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शेअर धारकांना 2424 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अंतरिम लाभांशाचं वितरण केलं आहे.यामुळं एनटीपीसीच्या शेअरमध्ये मंगळवारी (18 फेब्रुवारी 2025) तेजी पाहायला मिळाली. एनटीपीसीचा शेअर 2.94 टक्क्यांच्या वाढीसह 311.40 रुपयांपर्यंत पोहोचला.
वर्षभरात 8000 कोटींच्या लाभांशाचं वाटप
आर्थिक वर्ष 2024-25 या कालावधीत एनटीपीसीनं 8000 कोटींच्या लाभांशाचा वितरण केलं आहे. एनटीपीसीनं यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये 2424 कोटी रुपयांचा पहिला अंतरिम लाभांश दिला होता. त्या व्यतिरिक्त 18 फेब्रुवारीला अंतरिम लाभांश 2424 कोटी म्हणून शेअर धारकांच्या खात्यात वर्ग केला.एनटीपीसीनं 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अंतिम लाभांश सप्टेंबर 2024 मध्ये शेअर धारकांच्या खात्यात वर्ग केला होता. शेअर धारकांना 3152 कोटी रुपये त्यावेळी देण्यात आले होते. म्हणजेच शेअर धारकांच्या खात्यात लाभांश म्हणून आतापर्यंत या आर्थिक वर्षात 8000 कोटी लाभांश म्हणून जमा करण्यात आला आहे.
सलग 32 वर्ष लाभांश वाटप
एनटीपीसीनं सलग 32 व्या वर्षी लाभांशाचं वाटप केलं आहे. एनटीपीसी कंपनी देशातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. देशातील ऊर्जा निर्मितीमध्ये या कंपनीचा 25 टक्के वाटा आहे. कंपनीची सध्याची ऊर्जा निर्मितीची क्षमता 77 गिगावॅट इतकी आहे. याशिवाय 29.5 गिगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांची उभारणी सुरु आहे. यामध्ये 9.6 गिगावॅट ऊर्जा नवीकरणीयक्षम ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे. 2032 पर्यंत ही क्षमता 60 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचा एनटीपीसीचा प्रयत्न आहे.
एनटीपीसीकडून थर्मल, जलविद्युत प्रकल्प, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती केली जाते. कंपनीनं त्यांच्या कार्यकक्षेचा विस्तार केला आहे. न्यू एनर्जी वेंचुर्स, ई-मोबिलीटी, बॅटरी स्टोरेज, पंप आधारित जलविद्युत केंद्र, कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती, अणू ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन सोल्यूशन्स द्वारे वीज निर्मितीमध्ये पाऊल टाकलंय.
एनटीपीसीला आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 4711.4 कोटी रुपयांचा नफा झाला होता. नफ्यामध्ये 3.1 टक्के वाढ झाली होती. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत एनटीपीसीचा नफा 4571.9 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत महारत्न कंपनीचं उत्पन्न 41352.3 कोटी रुपये झालं होतं.
एनटीपीसीच्या बोर्डानं 2024-25 साठी दुसऱ्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली. 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर 25 टक्के म्हणजे 2.5 रुपये लाभांश जाहीर केला होता. तो लाभांश काल म्हणजेच 18 फेब्रुवारीला शेअर धारकांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.
इतर बातम्या :
सोनं पुन्हा महागलं, दरात 300 रुपयांची वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे?
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

