Chandrahar Patil : कुस्ती क्षेत्रासाठी माझा जीव गेला तरी चालेल, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा घणाघात; विविध मागण्यांसाठी उपोषणाच्या आखाड्यात
Chandrahar Patil : एक राज्य-एक खेळ-एक संघटना हि संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केली आहे.

सांगली: कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानांवर होणारा अन्याय हा स्पष्टपणे दिसतोय. कुस्ती क्षेत्राला आणि पैलवानाना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, मात्र त्यासाठी मी लढत राहणार आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये होणारे राजकारण आता थांबवले पाहिजे. नाही तर पैलवानांची नवीन पिढी तयार होणार नाही. अशी भीती व्यक्त करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक राज्य-एक खेळ-एक संघटना हि संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. या मागणीसह अनेक मागण्यांना घेऊन चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आहे.
वेळीच दखल घेतल्या गेली नाही तर मंत्रालयावर धडक मोर्चा
महाराष्ट्रात आज कुस्ती म्हटलं तर एक पारंपरिक खेळ म्हणून बघितलं जातं. त्यांच कुस्ती क्षेत्राची आज वाताहत होत आहे. त्यासाठी मी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली. आजवर ज्या स्पर्धा झाल्यात त्यात सलग स्पर्धा होत आहेत. एका 2025 वर्षांत चारदा महाराष्ट्रा केसरी स्पर्धा होणार आहे. किंबहुना राज्यात केवळ वर्षातून एकदाच ही स्पर्धा व्हायला पाहिजे. या प्रमुख आणि इतर मागणीला घेऊन मी आज आंदोलन करत आहे. मात्र त्याची वेळीच दखल घेतल्या गेली नाही तर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा ही चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटून याबाबत परत निवेदन देणार. मात्र सरकारने माझ्या मागणीबाबत विचार केला नाही तर लवकरच मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रहार पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय?
- राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकदाच झाली पाहिजे.
-एक राज्य-एक खेळ-एक संघटना हि संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे.
-महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकाने महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या पैलवानास 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले पाहिजे.
-ज्या पद्धतीने तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती करण्यात येते, त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे.
-पै. शिवराज राक्षे व पै. महेंद्र गायकवाड यांच्यावरील 3 वर्षांची बंदी हटवण्यात यावी आणि राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे.
या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
