Ajit Pawar : दौंड शुगरचे मोळीपूजन, अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय
Maratha Reservation : माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला होता. त्यानंतर दौंडमध्येही त्यांना विरोध होताना दिसतोय.

पुणे: दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (Daund Sugar Private Limited) या साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थित राहण्याला मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) विरोध केल्यानंतर आता पवार कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला आहे. दौंड कराखान्याच्या मोळीपूजनाचा हा कार्यक्रम त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) हस्ते होणार आहे. अजित पवारांच्या या खासगी मालकीच्या असलेल्या कारखान्याचे मोळीपूजन गुरुवारी होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झालेली आहे.
दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या मोळीपूजनाला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे हे मोळी पूजन अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवारांच्या हस्ते मोळीपूजन करू नका अशा आशयाचे पत्र मराठा क्रांती मोर्चाने पोलीस प्रशासनाला दिलं होतं. जर अजित पवार आले तर अजित पवारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. त्यानंतर आता अजित पवार या मोळीपूजनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली आहे.
माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमावेळी झाला होता विरोध
बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला होता. त्यानंतर अजित पवारांनी मोळी पूजनाला यायचं टाळलं होतं. त्यानंतर दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे अजित पवारांना मोळी पुजनाला बोलावू नका, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा घेतली. मराठा क्रांती मोर्चाने तशा आशयाचे पत्र पोलीस प्रशासनाला दिलं होतं.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवतो. पण दौंडमध्ये अजित पवारांच्या खाजगी मालकीचा कारखाना आहे. त्या कारखान्यावरती देखील मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांना येण्यास विरोध केला आहे.
नेत्यांना गावबंदी
मराठा आरक्षणावरुन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांना येण्यास विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. मात्र ज्या भागात अजित पवारांनी मोठा विकास केला आहे, त्याच भागात आता अजित पवारांना येण्यास वारंवार नकार दिला जात आहे आणि त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठ्यांकडून देण्यात येत आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
