(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाजी ब्रिगेडच्या मुंबई अध्यक्षासह राज्यभरातील शेकडो पदाधिकारी अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'त
NCP : आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असल्याचे राष्ट्रवादीच्या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.
मुंबई : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात आता फोडाफाडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोज कोणत्या कोणत्या पक्षात जाहीर प्रवेश सोहळे पाहायला मिळत आहे. अशात आता संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) मुंबई अध्यक्षासह राज्यभरातील शेकडो पदाधिकारी यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.
याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “बहुजनवादी विचारधारेसाठी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या मुंबई अध्यक्ष यांच्यासह राज्यभरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज अजितदादा पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अजितदादांच्या नेतृत्वात निस्वार्थपणे काम करण्याची इच्छा यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असल्याचे ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.
निवडणुकांमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे काम करायचे...
संभाजी ब्रिगेड संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला याबद्दल सर्वांचे आभार मानत अजित पवारांनी सर्वांचे पक्षात स्वागत केलं. संभाजी ब्रिगेड संघटनेची ओळख विचारांसाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना अशी आहे. हा आक्रमकपणा योग्य ठिकाणी वापरून त्यातून जनहिताची कामं आपल्याला करायची असल्याचं अजितदादांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आज महायुती सोबत सत्तेत सहभागी असली तरी शिव- फुले- शाहू- आंबेडकरांची बहुजनवादी विचारधारा पुढे घेऊन जात असल्याचं यावेळी अजितदादा म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे एकत्रित काम करायचं आहे. यासाठी एकमेकांना निश्चितच मदत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असल्याचे ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.
बहुजनवादी विचारधारेसाठी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या मुंबई अध्यक्ष यांच्यासह राज्यभरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज ना. अजितदादा पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस… pic.twitter.com/HJOSNd2CHY
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 21, 2024
पक्षाला आणखी भक्कम सामाजिक बळ मिळणार : मिटकरी
दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक व अभ्यासु संघटना संभाजी ब्रिगेडच्या मुंबई शहरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सागर भोसले यांच्या नेतृत्वात देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे पुरोगामी नेतृत्व म्हणून अजितदादांच्या नेतृत्वात झालेला हा पक्षप्रवेश सोहळा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी भक्कम सामाजिक बळ निर्माण करून देईल, असे मिटकरी म्हणाले.
उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक व अभ्यासु संघटना संभाजी ब्रिगेडच्या मुंबई शहरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सागर भोसले यांच्या नेतृत्वात देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला pic.twitter.com/fH9yEqXGux
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 21, 2024
इतर महत्वाच्या बातम्या :