J. P. Nadda : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा थेट वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; महायुती जागावाटप फॉर्म्युला निश्चित होणार?
वर्षा निवासस्थानी जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत झालेल्या 'क्लस्टर इलेक्शन सुकाणू समिती'च्या बैठकीत प्रदेश भाजपचे पदाधिकारी आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नड्डा यांनी सावरकर सदनला भेट दिली. यानंतर जेपी नड्डा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. नड्डा मुख्यमंत्र्यांसमवेत स्नेहभोजन करणार आहेत.
जागावाटप संदर्भात फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता
दरम्यान, वर्षा निवासस्थानी जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत जागावाटप संदर्भात फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, 'क्लस्टर इलेक्शन सुकाणू समिती'च्या बैठकीत नड्डा यांनी मार्गदर्शन केले.
400 प्लस एनडीए आणि 370 प्लस भाजप उद्दिष्ट
जेपी नड्डा म्हणाले की, पीएम मोदीजींच्या काळात देशात विकासाचं नवं पर्व सुरू झाला आहे. आताच्या सौभाग्यशाली काळाचे आपण साक्षीदार आहोत. आम्ही विक्रम रचण्यासाठी लढाई लढत आहोत. नव्या उमेदीने जोशाने ताकदीने निवडणूक लढवा. 400 प्लस एनडीए आणि 370 प्लस भाजप आपले उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले की, 370 सोबत आपले भावनिक नातं आहे. काश्मीरला तावडीतून मुक्त करण्याचे काम मोदींनी केले. मला विश्वास आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार या कामासाठी तुम्ही परिश्रम कराल.
आम्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मानवतेकडे अधिक लक्ष दिले
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा केली पण दिलं काहीच नाही. पंतप्रधान सन्मान योजनेतून लक्षावधी शेतकऱ्यांना मदत केली, त्यात महायुतीने भर टाकून अन्नदात्याचा सन्मान केला. विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर अटल सेतूची पायाभरणी आणि लोकार्पण मोदींनी केलं. देशातील सर्वात मोठा सागर सेतू मोदींच्या काळात झाला. कोरोनाच्या काळात आम्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मानवतेकडे अधिक लक्ष दिले. देशातील सांस्कृतिक इतिहासाला गौरवपूर्ण भावनेने पाहिलं जात आहे. आधी गरिबांच्या नावाने मतं मागत त्यांच्यावर अन्याय केला जात होता. आम्ही दहा वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्ट कार्ड काढलं आहे जे कुणीही केलेलं नाही.
नड्डांकडून वाजपेयींच्या भाषणाचा उल्लेख
ते म्हणाले की, पूर्वीच्या मंडळींनी गावागावात लोकालोकांत भांडणे लावली. मोदींनी सब का साथ सब का विकास ही नीती देशाला शिकवली. नड्डांकडून वाजपेयींच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला. 2 खासदार ते जगातील सर्वात मोठा पक्ष हा प्रवास आम्ही पाहिला आहे. गेल्या दहा वर्षात आपण तिमिरातून तेजाकडे आलो आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या