वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करून आलेला नर वाघ गेल्या महिन्याभरापासून धाराशिव सोलापूर सीमावर्ती भागात फिरत आहे.
Dharashiv Tiger Rescue Operation: गेल्या काही दिवसांपासून यवतमाळच्या टिपेश्वर जंगलातून धाराशिवच्या रामलिंग अभयारण्याजवळ वाघाचं दर्शन होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. धाराशिवमध्ये गेल्या महिनाभरापासून बस्तान बसवलेल्या वाघाला पकडून सह्याद्रीत सोडण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आल्यानंतर वाघ आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी धाराशिव बार्शी भागात फिरणाऱ्या वाघाच्या रेस्क्यूला परवानगी देण्यात आली आहे. वनविभागाकडून पाठवलेल्या प्रस्तावाला 15 दिवसांनंतर मुख्य वनसंरक्षकांनी मंजूरी दिली असून वाघाला पडण्यासाठी ताडोा प्रकल्पातील दहा जणांची रॅपिड रेस्क्यू टीम धाराशिवमध्ये दाखल झाली आहे. (Tiger Rescue)
गेल्या 20 दिवसात 12 हल्ले!
टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करून आलेला नर वाघ गेल्या महिन्याभरापासून धाराशिव सोलापूर सीमावर्ती भागात फिरत आहे. येडशी रामलिंग अभयारण्याच्या परिसरात या वाघाचा प्रामुख्याने वावर होता. गेल्या काही दिवसांपासून वैराग गावाच्या परिसरात हा वाघ वावरतोय. गेल्या 20 दिवसांत बार्शी तालुक्यातील 12 गाई, म्हशी, शेळ्यांवर वाघाने हल्ला केलाय. त्यामुळे शेतकरी आणि जनावरं पाळणाऱ्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हा वाघ जंगली भाग सोडून मानवी वस्तीजवळ येत असल्याने त्याला तत्काळ रेस्क्यू करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. (Tiger Attack) टिपेश्वर वरून धाराशिव परिसरात आलेल्या वाघाला पकडले जाणार असून त्यासाठी रेस्क्यू टीमही दाखल झाली आहे.
ताडोबा प्रकल्पातील 10 जणांचे पथक
वनविभागाने आता वाघाला पकडण्यासाठी परवानगी दिली आहे. यानंतर ताडोबा प्रकल्पातून आलेली 10 जणांची रॅपिड रेस्क्यू टीम धाराशिवमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये एक शार्पशूटर देखील आहे. वाघाला जखमी न करता सुरक्षितरीत्या पकडून सह्याद्री अभयारण्यात सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. वाघ पकडण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असं आवाहन वनविभागाने केलं आहे.
तीन वर्षाचा वाघ, T22 वाघिणीचा कब
मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात वाघाचं दर्शन झालं. वनविभागाने बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्ये वाघाची छबी कैद झाली. मराठवाड्यातील धाराशिवमध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान हा वाघ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळहून धाराशिवमध्ये आल्याची माहिती आहे. कॅमेरात कैद झालेला वाघ साधारण तीन वर्षाचा असून हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्याची T22 वाघिणीचा कब असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा: