Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
BJP on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी नाशिकमधील कृषि महोत्सवात हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग? असे वक्तव्य केले होते.

BJP on Chhagan Bhujbal : हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग? असा वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan) यांनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषि महोत्सवात केले होते. भुजबळांच्या या वक्तव्याचा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्याकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवले आहे, असे म्हणत तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी छगन भुजबळ यांना डिवचले आहे.
तुषार भोसले म्हणाले की, काही साधू-संत समाजात राहून कार्य करतात. तर काही साधू-संत समाजाच्या कल्याणासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या, साधना करतात. भुजबळांसारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला आणि पुतण्याला आमदार-खासदार करण्यासाठी करत नाहीत. अहो भुजबळ... तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्याकडे नीट बघा, असा हल्लाबोल त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय.
नेमकं काय म्हणाले होते छगन भुजबळ?
कृषि महोत्सवात भाषण करताना छगन भुजबळ म्हणाले होते की, अन्न धान्य, पाणी सगळ्या गोष्टीचे प्रदूषण वाढले आहे. मुंबईमध्ये दूध येते, त्याची भीती वाटते. किडन्या खराब होणार नाही तर मग काय होणार आहे? हे पाप नाही का मग? देवाची भक्ती शुध्द मनापासून केली पाहिजे. भक्ती पूर्वक आपण शेती केली पाहिजे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान हे आपल्याला सांगितले आहे. विज्ञानाची जोड कशी देता येईल? आपण अनेक प्रयोग कसे करू शकता? हे शिकले पाहिजे. आपल्या देशात सगळी विद्या आपल्या पुरतीच ठेवली. पुढच्यांना शिकवली नाही म्हणून ऱ्हास झाला आहे. हिमालयात संत महात्मा खूप आहेत, त्यांचं काय करायचं? मला काही उपयोग आहे का सांगा? असे त्यांनी म्हटले होते. इथे असे काही गुरु आहेत जे लोकांमध्ये राहतात आणि लोकांना शिकवतात, असे त्यांनी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याकडे पाहून म्हटले होते. त्र्यंबकेश्वर रस्ता, शिर्डी-पुणे रस्ता, विमानतळ, सप्तशृंगी गड रोपवे असे अनेक कामे आपण केले आहेत. या सगळ्यांचा उत्तम उपयोग करून घेतला पाहिजे. कांद्याला भाव आल्यावर सगळे कांद्याचेच पिक घेतात. मग कांद्याचे होऊ दे वांदे. तुम्हाला-आम्हाला कष्ट करावेच लागतील. ज्ञान हीच आमची खरी संपत्ती असल्याचे देखील छगन भुजबळ म्हणाले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

