Sunil Tatkare: ज्याने ज्याने घेरलं, त्या प्रत्येकाचा कार्यक्रम? सुनील तटकरेंनी महाडनंतर कर्जतकडे मोर्चा वळवला, शिंदे गटाच्या आमदाराला शह
Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंनी महाडनंतर आता कर्जतकडे मोर्चा वळवल्याचं चित्र आहे. शिंदेच्या आमदारांना शह देण्यासाठी कर्जतमध्ये राष्ट्रवादी पुन्हा तटकरे सक्रिय करण्याच्या तयारीत ते आहेत. सुधाकर घारे यांच्यासह कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केल्याचे पत्र समोर आले आहे.

महाड: नुकतीच विधानसभा लढवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, महायुतीकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने नाराज झालेल्या सुधाकर घारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह 22 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेचे तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीच्या कर्जत मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामे दिले होते. यानंतर नाराज झालेले घारे यांनी अपक्ष राहून कर्जत खालापूरची विधानसभा लढवली होती आणि या लढाईत ते अवघ्या पाच हजार मतांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा समोर पराभूत झाले होते. त्यानंतर ते आजपर्यंत राष्ट्रवादीपासून वेगळेच राहिले होते.
त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र काढलं आहे. यामध्ये सुधाकर घारे आणि त्यांच्या कर्जत खालापूर मतदार संघातील पदाधिकारी यांचे राजीनामे नामंजूर केल्याचे पत्र काढले आहे. यामुळे सुनील तटकरे यांनी महाडमध्ये गोगावले यांना शह देण्यासाठी स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा घाट आखला असून कर्जतमध्ये सातत्याने त्यांच्यावर बोचरी टीका करणाऱ्या महेंद्र थोरवे यांना पुन्हा शह देण्यासाठी सुधाकर घारे यांची घरवापसी करून घेत असल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे तटकरे यांनी महाडनंतर आता आपला मोर्चा कर्जतकडे वळवल्याचं दिसून येत आहे. कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे राजीनामे नामंजूर करण्यात आलेले सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्रक जाहीर करून माहिती दिली आहे.
शिवाजीराव गर्जे यांनी पत्रकामध्ये काय लिहलंय?
'आपल्या दिनांक 22/10/2025 च्या निवेदनाद्वारे कर्जत व खालापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचे व पदाचे राजीनामे खासदार सुनिल तटकरे यांचेकडे दिलेले होते. पक्ष नेतृत्वाने चर्चेअंती आपले राजीनामे नाममंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी आपण कार्यकर्ता म्हणून व पदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी व प्रसारासाठी जे अनमोल कार्य केले आहे ते प्रशंसनीय आहे. आपण यापुढे पुन्हा एकदा त्याच उमेदीन सक्रिय होऊन पक्ष संघटना वाडीसाठी व मजबूतीसाठी पुन्हा कार्यास लागावे ही विनंती. आपल्या कार्यास शुभेच्छा'.
भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप अखेर राष्ट्रवादीत
भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत भेट घेऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्नेहल जगताप सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत, जगताप यांची भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. एकीकडे भरत गोगावले यांच्याशी पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांचे वाद सुरू असताना दुसरीकडे तटकरे यांच्याकडून भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.























