Nashik Accident : कामावरून दोघेही घरी परतत होते, मात्र वाटेतच मृत्यूनं गाठलं, नाशिक त्र्यंबक मार्गावर भीषण अपघात
Nashik News : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर (Nashik Trimbakeshwer Accident) कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा नाहक बळी गेला आहे.
Nashik Accident : नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर (Nashik Trimbakeshwer Accident) कारचे टायर फुटून झालेल्या एका विचित्र अपघातात (Accident) दोन तरुणांचा नाहक बळी गेला आहे. टायर फुटल्याने नाशिककडे येणारी कार दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या लेनवर आल्याने कारने त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृती (Hotel Sanskruti) समोर सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून (Trimbakeshwer) नाशिककडे भरधाव वेगात येणाऱ्या होंडा सिटी कारचे (Honda City Car) अचानक टायर फुटल्याने कार अनेकदा उलटली. आणि दुसऱ्या लेनवर समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जाऊन ती धडकली. अपघाताची ही थरारक घटना हॉटेलच्याच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात हॉटेल बाहेरच रोडच्या कडेला उभी असलेली एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. नामदेव विठ्ठल शिद आणि सुनील मनोहर महाले या दुचाकी चालकांचा यात मृत्यू झाला आहे.
नाशिक (Nashik) तालुक्यातील राजेवाडी येथील नामदेव विठ्ठल शिद, आणि वाढोली येथील सुनील मनोहर महाले या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री 8 वाजेच्या सुमारास हॉटेल संस्कृतीसमोर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर रोडवरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचे टायर अचानक फुटले. त्यामुळे भरधाव वेगातील ही कार दुभाजक तोडून थेट विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. याचवेळी नाशिककडून त्र्यंबककडे जाणाऱ्या महाले व त्यानंतर शिंदे यांच्या दुचाकीवर ही कार जाऊन धडकली. या भीषण अपघाताक दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले.
सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गंभीर जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. तर होंडा सिटी कार मधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सुनील महाले हे स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तर, नामदेव शीद यांच्या पश्चात पत्नी व पाच अपत्य असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्वराज्य संघटनेचे करण गायकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सातपूर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता, मृत्यूचा सापळा
नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर शहर हे अंतर केवळ वीस ते 25 किलोमीटरचे आहे. दोन्हीही धार्मिक पर्यटनस्थळे असल्याने त्याचबरोबर नाशिकमध्ये सातपूर सारखी औद्योगिक वसाहत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला येणारे पर्यटक, नाशिकला जाणारे परिसरातील ग्रामस्थ यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता 24 तासही वर्दळीचा असतो. लहान मोठ्या वाहनांसह वाहतूक सुरूच असते. त्याचबरोबर रस्ताही चकचकीत असल्याने वाहने वेगाने सुसाट धावत असतात. आणि याच कारणांमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.