(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime | नागपुरातील पिंकी वर्मा हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
नागपूरच्या तांडापेठ भागात मंगळवारी संध्याकाळी पिंकी वर्माची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने अनेक वार करुन हत्या केली होती. परिसरात राजरोसपणे चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवल्यामुळेच पिंकीची हत्या करण्यात आल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.
नागपूर : नागपुरात मंगळवारी (20 एप्रिल) संध्याकाळी घडलेल्या पिंकी वर्मा हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिसरात राजरोसपणे चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवल्यामुळेच पिंकीची हत्या करण्यात आल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.
नागपूरच्या तांडापेठ भागात काल संध्याकाळी पिंकी वर्माची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने अनेक वार करुन हत्या केली होती. काही कामानिमित्त पिंकी वर्मा तांडापेठ परिसरातील तिच्या घरातून बाहेर पडतात, आधीच लपून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी तिच्यावर चाकूने सपासप वार केले. पिंकी वर्मा ही रक्ताच्या थारोळ्यात पडली. दाटीवाटीच्या परिसरात एका तरुणीवर हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. काही नागरिक पिंकीच्या मदतीला धावून जातील, त्याच्या आधीच हल्लेखोर तिथून पसार झाले होते.
पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, नेहमीच सामाजिक कामात रस घेणाऱ्या पिंकीचे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्या काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसोबत वाद सुरु होते. वस्तीत अवैध दारुची विक्री तसेच अवैधरीत्या चालवल्या जाणाऱ्या सट्टापट्टीचा अड्डा बंद करण्यासाठी पिंकी स्थानिक नागरिकांचा आवाज बुलंद करत होती. त्यामुळेच अवैध धंदे चालवणाऱ्यांनी तिची हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान पिंकी वर्माच्या हत्येला अनेक तास उलटले तरी पोलीस अद्यापही हल्लेखोरांना अटक करण्यात यशस्वी झालेले नाहीत.