(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत हेपॅटायटीस आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत घट
महानगरपालिका क्षेत्रात जलजन्य आजार बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट.हेपॅटायटीस रुग्णसंख्येत 86.60% घट, तर गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत 68% घट.
मुंबई : यंदा बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीचा तुलनात्मक अभ्यास केला असता वर्ष 2019 च्या तुलनेत वर्ष 2020 मध्ये जलजन्य आजार असणाऱ्या हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्येत तब्बल 83.60 टक्क्यांची, तर गॅस्ट्रो बाधितांच्या संख्येत 68.04 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या दरम्यान 1 हजार 494 एवढी असणारी हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्या यंदा म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर 2020 याच 11 महिन्यांच्या कालावधी दरम्यान 245 इतकी झाली आहे. याचाच अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत हेपॅटायटीस रुग्णसंख्येत तब्बल 83.60 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान 1 हजार 75 एवढी होती. याच 11 महिन्यांच्या कालावधीसाठी सदर रुग्णसख्ंया सन 2016 मध्ये 1 हजार 425, वर्ष 2017 मध्ये १ हजार 105, सन 2018 मध्ये 1 हजार 74 एवढी नोंदविण्यात आली होती.
स्वदेशी लशीची आता जे जे रुग्णालयात चाचणी!
जलजन्य आजार असणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या सख्ंयेत देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या 11 महिन्यांच्या कालावधी दरम्यान 7 हजार 247 रुग्ण आढळून आले होते. तर जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान 2 हजार 316 रुग्ण आढळून आले. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत गॅस्ट्रो रुग्णसंख्येत तब्बल 68.04 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. गॅस्ट्रो रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान 10 हजार 257 एवढी होती. याच 11 महिन्यांच्या कालावधीसाठी सदर रुग्णसख्ंया सन 2016 मध्ये 9 हजार 462, वर्ष 2017 मध्ये 7 हजार 911, सन 2018 मध्ये 7 हजार 315 एवढी नोंदविण्यात आली होती.
हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ आणि गॅस्ट्रो या दोन्ही जलजन्य आजारांच्या उपलब्ध आकडेवारीचा एकत्रित विचार करावयाचा झाल्यास जानेवारी ते नोव्हेंबर 2019 दरम्यान 8 हजार 741 रुग्ण आढळून आले होते. तर याच कालावधीसाठी यंदाच्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान 2 हजार 561 रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत जलजन्य आजारांच्या रुग्णसख्ंयेत 70.70 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.