Pune Oxygen Consumption : राज्याच्या 'या' विभागात अजूनही होतोय सर्वात जास्त ऑक्सिजनचा वापर
राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. राज्यात पुणे विभागात सर्वाधित ऑक्सिजनचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना पुणे विभागात मात्र सर्वात अधिक ऑक्सिजनचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते सध्याच्या घडीला संपूर्ण राज्यात पुणे विभागात सक्रीय रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांचा कोरोना रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर अधिक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाखाच्या खालीच आहे तर पुणे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्यने 1 लाखाचा आकडा ओलांडला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याचा ऑक्सिजनचा वापर 200 मेट्रिक टनांच्या खाली असताना पुण्यातील ऑक्सिजनचा वापर मात्र 500 मेट्रिक टनांहून अधिक असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
अन्न आणि औषध प्रशासन विभाग दररोज कोरोना रुग्णालयात प्राणवायूचा राज्यात होणार वापर आणि सध्याचा साठा यावर दैनंदिन अहवाल सादर करत असतो, त्याच्याच 29 एप्रिल, गुरुवारी दिलेल्या अहवालानुसार एका दिवसात संपूर्ण राज्यात 1400.03 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर रुग्णांकरीता करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वात अधिक वापर हा पुणे विभागात करण्यात आला असून तो 575.82 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात इतका वापर का होतोय त्याची कारणे फार सोपी आहेत. पुणे विभागात मुख्यत्वे करून पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या मोठ्या जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. या पूर्ण विभागात 836 कोरोनाचा उपचार करणारी स्वतंत्र रुग्णालये असून राज्यात सर्वात जास्त रुग्णालय असणार हा विभाग आहे. या विभागातील एकट्या पुणे जिल्ह्यात 416.080 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर एका दिवसात केला गेला आहे.
त्याखालोखाल औरंगाबाद विभागात प्राणवायूचा वापर करण्यात आला असून तो 191.36 मेट्रिक टन इतका आहे. औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात एकूण 358 रुग्णालयात कोरोनाचे उपचार दिले जातात. नागपूर विभागात 190.70 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर केला गेला असून या विभागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या विभागात 232 रुग्णालये कोरोनाचा उपचार करीत आहे. मुंबई विभागात 181.94 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर करण्यात आला असून मुंबई विभागात फक्त मुंबई जिल्ह्याचा समावेश असून या विभागात कोरोनावर उपचार करणारी 161 रुग्णालये आहेत. ठाणे विभागात 151.12 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर केला गेला असून या विभागात ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण 278 कोरोनाचे उपचार देणारे रुग्णालये आहे. नाशिक विभागात दिवसाला 91.19 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण 665 कोरोनाचे उपचार देणारे रुग्णालये आहे. तर राज्यात सर्वात कमी प्राणवायूचा वापर अमरावती विभागात होत असून तो 50.91 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश असून येथील 156 रुग्णालयात कोरोनाचे उपचार देण्यात येत आहे.
पुणे येथील श्वसनविकारतज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात की "सध्या ऑक्सिजनची मागणी अधिक आहे. कारण रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनला सध्यातरी दुसरा कुठलाच पर्याय नाही. ऑक्सिजन देण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे ती जरी आपल्या नर्सिंग आणि पॅरा मेडिकल स्टाफने व्यवस्थित ठेवली तरी ऑक्सिजनचा अपव्य मोठ्या प्रमाणात टळू शकेल. अनेक छोट्या चुकांमधून अनेकवेळा हा ऑक्सिजन वायाही जात असतो. तर तो आपण वाचविला पाहिजे. ऑक्सिजनची पातळी रुग्णांची स्थिती त्याच्या शरीराची किती मागणी आहे यावर व्यवस्थित लक्ष ठेवले पाहिजे. अनेकवेळा गरज नसतानाही रुग्णाच्या ऑक्सिजन प्रमाणात बदल करण्यात येत नाही तर ह्या गोष्टी छोट्या असल्या तरी सध्याच्या घडीला यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर भविष्यात नक्कीच ऑक्सिजनची चणचण भासण्याची शक्यता नाकारता येत नाही."
एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे कि नाही ते डॉक्टर ठरवतात. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिकदृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील प्राणवायू घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम प्राणवायूची गरज भासते.
पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात श्वसनविकार तज्ञ डॉ. विशाल मोरे सांगतात कि, "यामध्ये विशेष म्हणजे काहीजण जे घरी विलगीकरणात राहून उपचार घेत आहे ते व्यवस्थित ऑक्सिजनच्या नोंदी करून ठेवत नाही. शिवाय औषध उपचार व्यवस्थित घेत नाही. अनेकवेळा ताप आला म्हणून क्रोसीनची गोळी खाऊन दिवस काढतात. तब्बेत बिघडली किंवा ऑक्सिजनची पातळी खाली उतरली कि रुग्णालयात अशी बिकट अवस्था असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन द्यावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे बहुतांश आजुबाजुंच्या जिल्ह्यातील रुग्ण हे पुण्यात येत असतात . त्यामुळे पुण्यातील सक्रीय रुग्णसंख्या ही सर्व जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे."
या कोव्हिडच्या आजारात कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो. वैद्यकीय तज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते.