Sanjay Raut : एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
Sanjay Raut : ज्या पद्धतीने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना फोडण्यात आली. त्याप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडला जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेत नवा 'उदय' होणार, असे विधान याआधी केले होते. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला (BJP) देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरू राहिल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये आज बैठक आहे. मागील निवडणुकीतील पराभवाला खचून न जाता महानगर पालिका लढणार आहोत. स्वबळाचा नारा दिला म्हणजे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा अर्थ निघू शकत नाही. मुंबईपुरता स्वबळाचा नारा आहे. आमच्या पक्षाचा तिथे पगडा आहे. आमची पकड आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, स्वबळावर लढावं. स्वबळावर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात लढणार याबाबत शंका आहे. तर इतर शहरात एकत्र लढावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तोपर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरु राहणार
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटात उदय होणार आहे. ज्या पद्धतीने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना फोडण्यात आली. त्याप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल. यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरु राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंकडे पर्याय नव्हता
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, आपण सत्तेत असले पाहिजे असं आम्ही सर्व आमदारांनी त्यांना समजावले. तेव्हा ते उपमुख्यमंत्री पदासाठी तयार झाल्याचा गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते काय गौप्यस्फोट करणार? फडणवीस मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी हायकामंडचा मान राखला असे म्हटले. काहीही करून सत्तेत राहायचं ही या सर्वांची भूमिका आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढल्या. त्यांना 2024 ला मुख्यमंतत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता. तरीही ते मुख्यमंत्री झाले नाही. मग, कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतो कुठे? यांचे हायकमांड भाजप आहे. त्यांचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरील खटले थांबवण्यासाठी त्यांना सरकारमध्ये जावे लागले, अशी टीका त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
आणखी वाचा