महाबीज सोयाबीन बियाण्यांचा लातूर जिल्ह्यात तुटवडा; खासगी कंपनीच्या बियाण्यांच्या दरात प्रचंड वाढ
महाबीज सोयाबीन बियाण्यांचा लातूर जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. तर खासगी कंपनीच्या बियाण्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने हे दर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलीय.

लातूर : यंदा खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या दारात मोठी वाढ झालीय. त्या तुलनेत महाबीजचेचे दर मात्र कायम आहेत. बाजारात सध्या सोयाबीनच्या बियाण्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र, सध्या मार्केटमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात येते. प्रति क्विंटल यंदा बाजारात सोयाबीनला सात ते साडेसात हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांचा ओढा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे अधिक आहे. सध्या शेतकरी बाजारात सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बाजारात यंदा खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या दारात वाढ झालीय. त्या तुलनेत महाबीजच्या बियाणांचे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकरी महाबीजची बियाणे खरेदीस प्राधान्य देत आहेत. मात्र, बाजारात महाबीज बियांनांचा स्टॉक शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे लागत आहेत.
शासनाने खाजगी कंपनांच्या बियाणांचे दर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 'महाबीजच्या बियाण्याचा दर हा 2250 आहे तर खाजगी कंपनीच्या बियाण्याचा दर हा 3000 च्या पुढे आहे. सरकारने दर नियंत्रणात आणून आम्हास मदत होईल असे धोरण तयार करावे' असे मत हिप्परसोगा येथील मदन सोमवंशी यांनी व्यक्त केले आहे. 'महाबीजकडून दरवर्षी जिल्ह्यात 25 ते 27 हजार क्विंटल बियांने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. यंदा जवळपास 20 हजार क्विंटल बियाणे आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलीत. यंदा खासगी कंपन्यांचे बियाणांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा महाबीजच्या बियाणांकडे अधिक असल्याची माहिती महाबीजचे जिल्ह्य व्यवस्थापक सर्जेराव चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान महाबिजच्या बियाणांचा स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे महाबीज बियाणाच्या विक्रेत्यांना दुकानासमोर स्टॉक शिल्लक नसल्याचा बोर्ड लावावा लागत आहे. शेतकरी सतत या दुकानांमध्ये येऊन मागणी करत आहेत. जिल्ह्याभरात 48 अधिकृत दुकानातून महाबीज बियाणे विकली जात आहेत. मात्र, माल आला की तात्काळ त्याची विक्री होत असल्याने आता दुकानासमोर स्टॉक नसल्याच्या पाट्या लावण्याची वेळ आमच्यावर आली आहे. यावर्षी उठाव जास्त आहे, अशी माहिती महाबीज विक्रेते प्रमोद जोशी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
सोयाबीनला यावर्षी विक्रमी दर मिळाला असल्याने शेतकऱ्याचा ओढा सोयाबीनच्या लागवडीकडे आहे. करोना काळात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीन बियाणांच्या दरात सरकारने हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणले तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
