'गोष्टी घ्या गोष्टी' या युट्यूब चॅनेलने पार केला शंभर व्हिडीओचा टप्पा, जगभरातील असंख्य चाहत्यांचा प्रतिसाद
डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन अॅण्ड कल्चरल ट्रस्टच्या 'गोष्टी घ्या गोष्टी' या युट्यूब चॅनेलने आता शंभर व्हिडीओचा प्रवास पूर्ण केला आहे.
मुंबई : 'गोष्टी घ्या गोष्टी' या युट्यूब चॅनेलचे शंभर व्हिडीओ पूर्ण झाले आहेत. या युट्यूब चॅनलची निर्मिती संस्था डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन अॅण्ड कल्चरल ट्रस्ट आहे. 'गोष्टी घ्या गोष्टी' चे सगळे भाग चित्रित करण्याची ते एकत्रित करण्याची धुरा राजू माठिचा यांनी सांभाळली.
'गोष्टी घ्या गोष्टी' चे शंभर भाग पूर्ण झाले. त्यानिमित्ताने असंख्य गोष्टींच्या पुस्तकांमधील सर्व गोष्टी माहित असलेल्या लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की," 'गोष्टी घ्या गोष्टी' या युट्यूब चॅनेलचे नावच खूप भारी आहे. डॉ. विजया वाड यांच्या संकल्पनेतून हे युट्यूब चॅनेल साकार झाले आहे. आणि याची निर्मिती केली आहे डॉ. निशिगंधा वाड यांनी. जगभरातील असंख्य लोकांनी या युट्यूब चॅनेलला भेट दिली आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या त्या सर्व गोष्टी वेंधळांचं मी मनापासून कौतुक करते."
'गोष्टी घ्या गोष्टी' च्या शतकमहोत्सवी व्हिडीओमध्ये जान्हवी खांडेकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची गोष्ट सादर केली. नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान क्रांतीकारक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी इतिहासामार्फत लोकांना माहित असतात. मग त्यात इंग्रजांच्या नजरकैदेतून केलेले पलायन, इंग्रजांचा शत्रू तो आपला शत्रू हा विचार करून केलेली आझाद हिंद सेनेची स्थापना असेल वा 'चलो दिल्ली'चा नारा असो. पण नेताजींच्या बालपणीच्या अनेक गोष्टी आपल्या वाचनात येत नाहीत. नेताजींवर विवेकानंदांच्या साहित्याचा प्रचंड प्रभाव होता. त्यातून ब्रिटिशविरोधी भावना निर्माण झाली. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे ही भावना लहान वयातच त्यांच्यात रुजू झाली होती. त्यामुळे नेताजींचे वडील रायबहादूर त्यांना परदेशी घेऊन गेले जेणेकरून ते ब्रिटिशविरोधी भावनेतून बाहेर पडतील. ब्रिटिशांविरोधी संतापलेल्या नेताजींनी मात्र तिथेही सर्वांनाच त्यांचे देशप्रेम दाखवून दिले. त्यांनी नेहमीच ब्रिटिशांची चाकरी करणं नाकारलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
'गोष्टी घ्या गोष्टी' चा शंभरावा व्हिडीओ जान्हवी खांडेकरांच्या गोष्टीने बहारदार झाला. 'गोष्टी घ्या गोष्टी' या उपक्रमात संपूर्ण जगभरातील, विविध वयोगटातील रसिक सहभागी झाले होते. डॉ. विजया वाड यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. निशिगंधा वाड यांच्या निर्मिती संस्थेतून स्थापन झालेल्या 'गोष्टी घ्या गोष्टी' चा प्रवास अखंड सुरू राहिल अशी आशा व्यक्त केली जात आहे.