अॅपवरुन केलेली मैत्री महागात, नोकरीचं अमिष दाखवून महिलेवर अत्याचार, तोतया पोलिस जेरबंद
शिर्डी येथील महिलेची एका अॅपवर ओळख करुन शिर्डी येथे पोलीस असल्याचे सांगत नोकरीचं अमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिर्डी : शिर्डी येथील महिलेची एका अॅपवर ओळख करुन शिर्डी येथे पोलीस असल्याचे सांगत नोकरीचं अमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खोटी माहिती देत महिलेला पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून बीडच्या तोतया पोलीसाने तिच्याशी शारिरीक संबध जोडून लग्न करतो असे सांगितले. नंतर तिला मारहाण करत तिची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या तोतया पोलिसाला अटक केली आहे.
बीड येथील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महिलेशी मिशो अॅपच्या माध्यमातून ओळख करत मैत्री केली. तसेच पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो टाकत शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी घसट वाढविली. तुला पोलीस भरतीत मदत करतो तु नवऱ्याला सोडून दे माझ्याशी लग्न कर तुला सुखी ठेवीन असे सांगून तिच्याशी शारिरीक संबध ठेवले.
नंतर तो तोतया पोलीस असल्याचा फिर्यादीला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बु्क्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सदर महिलेने राहाता पोलीसात फिर्याद दिली . तिची फिर्याद नोंदवून घेत पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले.
या प्रकरणी तोतया पोलीस किरण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास सहा. पो नि प्रशांत कंडोरे हे करत असून या आरोपीने तोतया पोलीस बनून अजून कुणाची फसवणूक केलीय का याचा तपास आता पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
