पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला, एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल
गोपीनाथ गडावर येऊन राजकारणावर न बोलणे म्हणजे पायात बेड्या घालून पळायला सांगण्यासारखे आहे. भाजपचे सध्याचं चित्र आहे ते चांगलं नाही, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.
![पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला, एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल eknath Khadse on pankaja munde defeat in vidhan sabha election पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला, एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/12143636/Khadse-speech.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तच्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात भाजपमधील खदखद बाहेर निघाली आहे. ज्यांना आम्ही मोठं केलं, त्यांच्याकडून छळाची अपेक्षा नव्हती, अशी टीका एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली. गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात पंकजा मुंडे पराभूत झाल्या याचं मला दु:ख आहे. पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचं पाप तुमच्या मनात का आलं? पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला गेला आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.
गोपीनाथ गडावर येऊन राजकारणावर न बोलणे म्हणजे पायात बेड्या घालून पळायला सांगण्यासारखे आहे. भाजपचं सध्याचं चित्र आहे ते चांगलं नाही. पंकजा मुंडेंना होणाऱ्या वेदना त्यांना सांगता येत नाहीत. गोपीनाथ मुंडे साहेबांची मुलगी आहे. या मतदारसंघात पराभूत झाली, याचं मला दु:ख आहे. माझं स्पष्ट मत आहे की, हे घडलं नाही घडवलं गेलं. याठिकाणी पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचं पाप तुमच्या मनात का आल? असं किती दिवस सहन करायचं, असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला.
पंकजा मुंडे पक्ष बदलणार नाहीत, मात्र माझा काही भरोसा नाही. ज्यांनी पक्ष मोठा केला त्यांना आज पक्षात गुदमरल्यासारखं का वाटतंय? पक्ष सोडून द्यायला भाग पाडलं जात आहे, तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. आपोआप पक्ष सोडून गेले पाहिजेत ही नीती पक्षातल्या लोकांकडून राबवली जाते आहे, ती योग्य नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रदेशाध्यक्ष मुंडेसाहेबांनी केलं. 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. मंत्रीपदी असताना गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला मी औरंगाबादला जागा दिली. सरकार असताना पाच वर्षात स्मारक झालं नाही. सरकार गेले तरी स्मारक झालं नाही. मात्र नव्यानं सरकार आलं त्यावेळी मुंडेसाहेबांच्या स्मारकाला दोन दिवसात मंजुरी मिळाली. त्यामुळे सरकार पुन्हा आले हे बरं झालं आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो, असं एकनाथ खडसे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)