सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम पार्क तयार करणार : धनंजय मुंडे
राज्यातील जो कुणी दिव्यांग बांधव आहे ज्याला ठराविक अवयवाची गरज आहे त्याबाबतची माहिती आम्ही देणार आहोत. यासोबतच ज्यांना अवयव दान करायचे आहेत त्यांची देखील माहिती याठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत.

मुंबई : राज्यात अपंगत्व लवकर लक्षात आल्यास अशा रुग्णांवर तत्काळ उपचार करता येणार आहेत. यासाठी आम्ही लवकरात लवकर ज्याप्रकारे लातूरला ऑटिझम पार्क उभारलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ऑटिझम पार्क उभारणार आहोत. यामुळे दिव्यांग व्यक्तींची संख्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपूर्ण संगणक व तंत्रज्ञान नावाच्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचं प्रकाशन सह्याद्री अतिथीगृहात पार पडलं. यावेळी दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे अरुण भास्कर, असोसिएशनचे संचालक अर्जुन मुद्दा उपस्थित होते. संपूर्ण संगणक व तंत्रज्ञान पुस्तकाचं लेखन प्राध्यापिका गौरी कापूरे आणि हेमंत देव यांनी केलं आहे. या पुस्तकाचा फायदा एमपीएससीसाठी विद्यार्थ्यांना होणार आहे. या पुस्तकाचे एकूण पाच भाग आहेत.
या पुस्तकाबाबत अधिक माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर म्हणाले की, या पुस्तकाची विक्री किंमत 3 हजार रुपयांच्या आसपास आहे. परंतु कोटक महिंद्राने सीएसआर फंड दिल्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व अंध विद्यालयांना मोफत देण्यात येणार आहे. सुरुवातीला या पुस्तकाच्या 350 कॉपी छापण्यात आल्या आहेत. गरजेनुसार त्या विद्यालयांच्या मागणीनुसार आम्ही पुस्तकं त्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहोत.
दरम्यान धनंजय मुंडे पुस्तकाबाबत बोलताना म्हणाले की, या पुस्तकामुळे संगणक पाहू न शकणारे आता संगणक चालवू शकणार आहेत. ही दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आज पुस्तक प्रकाशन पार पडलं आहे. या पुस्तकात संगणकाची ओळख, हार्डवेअर सॉफ्टवेअर या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने मी लेखकांचं कौतुक करतो. कारण संगणक पाहू न शकणारे ते पुस्तकाचा वापर करून ते चालवू शकणार आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. ही आवृत्ती खूप महत्त्वाची आहे. माझ्या विभागांतर्गत मी प्रत्येक जिल्ह्यात अपंगत्व लगेचच ओळखता यावे यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर करत आहोत.
काही महिन्यांपूर्वी दिव्यांग विभागाचं पोर्टल सुरू केलं आहे. राज्यातील जो कुणी दिव्यांग बांधव आहे ज्याला ठराविक अवयवाची गरज आहे त्याबाबतची माहिती आम्ही देणार आहोत. यासोबतच ज्यांना अवयव दान करायचे आहेत त्यांची देखील माहिती याठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. पुढील दीड महिन्यात हे पोर्टल सुरू होईल. त्यामाध्यमातून दिव्यांग बांधवांची संख्या कमी करायचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात दिव्यांगत्व घालवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढं येतील अशी आशा बाळगतो, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
