(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara Crime : रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, जादूटोणा केल्याच्या संशयातून हत्या
संशयाने मनात घर केलं की किती मोठा अनर्थ घडतो याची प्रचिती भंडाऱ्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं असून जादूटोणा केल्याच्या संशयातून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
भंडारा : भंडाऱ्यातील नवेगावात कपडे धुवायला गेलेल्या 45 वर्षीय महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेची हत्या झाल्याचा समोर आलं आहे. महिलेने जादूटोणा करुन आपल्या पत्नीला मारलं असा संशय आरोपी राजहंस कुंभरेला आला. त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने संबंधित महिलेच्या डोक्यात काठी मारुन आणि गळा दाबून तिचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजहंस कुंभरे आणि विनोद रामटेके या दोघांना अटक केली आहे.
संशयाने मनात घर केलं की किती मोठा अनर्थ घडतो याची प्रचिती भंडाऱ्यात जिल्ह्यात आली. जादूटोणा करुन आपल्या पत्नीला मारल्याच्या संशय राजहंस कुंभरे याला होता. त्याने मित्राच्या मदतीने 45 वर्षीय महिलेची डोक्यावर काठीने वार करत गळा दाबून तिची हत्या केली. भंडाऱ्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव गावात ही घटना उघडकीस आली.
कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव इथे 28 एप्रिल रोजी रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. बबित तिरपुडे असं या महिलेचं नाव असून ती कपडे धुवायला गेली होती. डोक्यावर काठी मारुन आणि गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळे माझी पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाला. याचा राग मनात धरुन बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडेचा खून केल्याचं राजहंस कुंभरेने सांगितलं. मित्र विनोद रामटेके याच्या मदतीने बबिता तिरपुडेचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
दरम्यान कारधा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या