Bhandara Accident : वाळूच्या भरधाव टिप्परनं तिघांना चिरडलं, 8 वर्षाच्या लेकीचा मृत्यू, वडिलांसह चिमुकला गंभीर जखमी
Bhandara Accident : आठ वर्षांच्या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला तर वडील आणि भावाला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भंडारा : वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परनं दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना चिरडलं. या भीषण अपघातात 8 वर्षीय एकता सेलोकर या चिमुकलीचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर तिचे वडील विजय सेलोकर (45) आणि अन्य एक 10 वर्षीय चिमुरडा वीर मारवाडे असे दोघे गंभीर जखमी झालेत. दोन्ही गंभीर जखमींना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील रेल्वेच्या उड्डाण पुलावर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातानंतर वरठी येथील ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरून संताप व्यक्त केला. याप्रकरणी वरठी पोलिसांनी चालकासह टिप्पर ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय सेलोकर हे कुटुंबासह ऐकलारी या गावात राहतात, मृतक एकता आणि जखमी वीर हे एकाचं वर्गात शिक्षण घेत असून खासगी शिकवणी वर्गातून दोघांनाही दुचाकीनं घरी परत नेतं असताना ही घटना घडली.























