लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजनेचा लाभ काबाड कष्ट करणाऱ्या महिलांसाठी आहे. पण, काही वेगळ्याच महिलांनी त्याचा फायदा घेतला. त्यामुळे, त्यांची छाननी सुरु आहे.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतोष देशमुख हत्याकांड, लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana), छावा सिनेमा आणि संभाजी महाराजांबद्दल आमदार अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य सध्या गाजत आहे. त्यातच, विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत असल्यावरुन सरकारवर टीका केली आहे. तसेच, निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याची देखील विचारणा होत आहे. मात्र, महायुतीने पहिल्याच अर्थसंकल्पा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे म्हटले नसल्याचे सांगत 5 वर्षातील कार्यकाळात याचा निर्णय होईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. त्यातच, आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेंसदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठीच ही योजना होती, पण त्याचा फायदा वेगळ्याच महिला घेत आहेत, असे आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ काबाड कष्ट करणाऱ्या महिलांसाठी आहे. पण, काही वेगळ्याच महिलांनी त्याचा फायदा घेतला. त्यामुळे, त्यांची छाननी सुरु आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले. मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेच्या सुरू असलेल्या छाननीचं समर्थन केलं असून ह्या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जात असल्याचे म्हटले आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांना आकर्षित केले, या योजनेमुळेच पुन्हा मोठ्या बहुमताने ते निवडणूक जिंकले. पण, आता लाडक्या बहिणींकडून योजनेचा लाभ काढून घेत असल्याचे सांगत विरोधकांकडून टीका केली जात आहे. आत्तापर्यंत 9 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
वीकीपिडीयावर चुकीचं लिखाण
आमदार मिटकरी यांनी संभाजी महाराजांवरील लिखाणाबद्दलही भाष्य केलं. ''या सत्तेत जीव रमत नाही'' हा नामदेव ढसाळांचा काव्यसंग्रह मला फार आवडतो, त्या नामदेव ढसाळांचा अपमान सेन्सॅार बोर्डाने केला आहे. छावा चित्रपटामुळे सर्वच आता छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्च करु लागले आहेत. मात्र, विकीपिडीयावर अजूनही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे लिहिले गेले आहे. राम गणेश गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास आणि चुकीच्या भाषेत लिहिले आहे, त्या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. 18 नाटके, 30 बदनामीकारक चित्रपटे आणि पुस्तके आजही उपलब्ध आहेत, त्यांच्यावर बंदी आणावी, असेही ते म्हणाले.
जीभ हासाडण्याची शिक्षा योग्य
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्याबद्दल इतिहासाच्या पुस्तकात धडे समाविष्ठ करावे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमीने महाराजांचा अपमान केला आहे. अशा लोकांना जीभ हासडण्याची शिक्षा झाली तरी योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे बोलणऱ्यांवर कडक कायदे आणावे, अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केली. तसेच, हाथी घोडे पालखी … फौज तो तेरी सारी है… लेकीन अब भी मेरा राज सब पर भारी है. बलिदान दिवस आहे त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करावे, असे मिटकरी यांनी म्हटले.
हेही वाचा
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
























