30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
मतदारांनी आशीर्वाद दिला, 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली आणि आमदार झालो. त्यामुळे, हा गुलाल लवकर उतरणार नाही
![30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल 30 years of power overthrown by 30 thousand votes in 3 months says Abhijit patil NCP candidate of Sharad Pawar madha vidhansabha election 2024 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/e0aba89ef24fd9c338a286e76577f5be17325424783881002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालातून महाविकास आघाडीचं (Mahavikas aghadi) पाणीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीने तब्बल 236 जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालंय. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या 10 जागांपैकी 4 जागा एकट्या सोलापूर जिल्ह्यातून जिंकल्या आहेत. त्यामध्ये, माढा, माळशिरस आणि मोहोळ मतदारसंघातून तीन नवे चेहरे राष्ट्रवादीचे आमदार बनले आहेत. तर, करमाळ्यातून नारायण पाटील हे माजी आमदार पुन्हा विधानसभेत पोहोचले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या माढा मतदारसंघात यंदा 6 टर्म आमदार राहिलेल्या बबन शिंदे यांच्या पुत्राचा पराभव करत अभिजीत पाटील आमदार बनले आहेत. 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडल्याचं सांगत, मतदारांनी शेतकऱ्याच्या मुलाला आशीर्वाद दिल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मतदारांनी आशीर्वाद दिला, 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली आणि आमदार झालो. त्यामुळे, हा गुलाल लवकर उतरणार नाही, असे म्हणत माढा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी विजयावर प्रतिक्रिया दिलीआहे. माढ्याची निवडणूक जनतेने हातात घेतली होती, आणि शेतकऱ्याच्या मुलाला निवडून दिलं. गेली 30 वर्ष इथे दुसऱ्यांची सत्ता होती, मी पहिल्यांदाच आमदार झालो आहे, त्यामुळं मला राज्याचा अभ्यास करावा लागेल असेही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, माढा विधानसभेत बबन शिंदे हे गेल्या 6 टर्मचे आमदार होते. पण, यंदा वयाच्या ज्येष्ठत्वामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याऐवजी पुत्राला मैदानात उतरवलं होतं. मात्र, त्यांचा पराभव झाला.
माढ्यात बबन शिंदेंच्या गड्याला धक्का
माढा लोकसभा निवडणुकांवेळी कारखान्यावर आलेल्या जप्तीच्या नोटीसनंतर अभिजीत पाटील यांनी भाजपला सहकार्य केलं होतं. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारखान्यावर सभाही घेतली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट महाविकास आघाडीकडून खिंड लढवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटील यांना माढ्यातून तिकीट देण्यात आलं होतं. अभिजीत पाटील यांच्यासाठी शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे सभा घेतल्या, त्याचा मोठा फायदा त्यांना झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांची साथ सोडून त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष निव़डणुकीच्या रिंगणात उभे केले. तर, महायुतीकडून अजित पवार यांनी काँग्रेसच्या मिनल साठे यांनी येथून तिकीट दिलं होतं. मात्र, निवडणुकीत शरद पवारांच्या अभिजीत पाटील हे तब्बल 30 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)