माझे पती गुजराती पण ते अस्खलित मराठी बोलतात; भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन दमानियांनी सांगतिलं भाषाप्रेम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मराठीबाबत (Marathi) केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झालाय. यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Anjali Damania : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मराठीवरुन (Marathi) केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्राची (म्हणजेच मुंबईची) भाषा मराठीच आहे आणि मराठीच राहणार. महाराष्ट्रात सगळ्या भारतीयांचे नेहमीच स्वागत, पण महाराष्ट्रात येऊन, मराठी बोलायला मात्र शिकले पाहिजे असं अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. माझे पती गुजराती आहेत पण त्यांना अस्खलित मराठी बोलत येते. माझी मुलं जन्मापासून माझ्याशी मराठीत बोलतात आणि त्यांच्या बाबांशी गुजरातीत बोलतात. आपली भाषा आपण जपली पाहिजे आणि प्रत्येक भाषेचा आदर देखील केला पाहिजे असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते भैय्याजी जोशी?
मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले होते.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
भय्याजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते मी ऐकून त्यावर मी बोलेन. मुंबईतील आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, त्याला समजली पाहिजे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तोच इतरांच्या भाषेवर प्रेम करु शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:























