(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक... जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना अमानुष मारहाण
Chandrapur Crime : चंद्रपुरात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 जणांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांकडून 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
Chandrapur Crime : जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण गावादेखत या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. पण तरिही त्यांना मदत करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अंगात येणाऱ्या महिलेनं नाव घेतलं म्हणून कुटुंबाला ही अघोरी शिक्षा दिली गेली आहे.
चंद्रपुरात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 जणांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांकडून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. जिवती तालुक्यातील वणी-खुर्द या गावात ही घटना घडली. शनिवारी दुपारी भर चौकात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्याती करण्यात आली होती. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) अशी मारहाण झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. हे कुटुंबिय जादूटोणा करत असल्याचा संशय गावकऱ्यांना आधीपासूनच होता.
पोलिसांनी या 12 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी देखील दलित समाजातील आहेत. मारहाण झालेल्या कुटुंबावर आधीपासूनच गावातल्या लोकांचा जादूटोणा करत असल्याचा संशय होता, त्यातच मोहरमच्या सवारी दरम्यान गावातील काही महिलांच्या अंगात आलं आणि त्यांनी गावातील कांबळे आणि हुके कुटुंबातील लोकांची जादूटोणा करतात म्हणून नावं घेतली. त्यांच्या सांगण्यावर गावकऱ्यांचा विश्वास बसला आणि त्यानंतर या लोकांना गावकऱ्यांनी चौकात बोलावून मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी-खुर्द या गावात दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळ गाठलं. त्यावेळी गावातील दोन कुटुंबातील 7 जणांना बांधून मारहाण केली जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर उपस्थितांर तत्काळ कारवाई करत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :