Kolhapur Jaggery : गूळ सौदे पूर्ववत; कोल्हापूरच्या नावावर कर्नाटकी गूळ विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोल्हापूरमध्ये गुळाला किमान 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडले होते. दरम्यान, तीन दिवसानंतर मार्केट यार्डात गुळाचे सौदे पूर्ववत सुरु झाले.

Kolhapur Jaggery : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला किमान 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडले होते. दरम्यान, तीन दिवसानंतर मार्केट यार्डात गुळाचे सौदे पूर्ववत सुरु झाले. बाजार समितीचे उपसचिव के. डी. पाटील यांच्या उपस्थितीत गूळ सौदा पार पडला.
प्रतवारीनुसार गुळाला 3300 ते 4200 रुपये इतका दर मिळाला. गुळाला सरासरी 3700 रुपये इतका दर राहिल्याने उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे दोन ते अडीच कोटी रुपयांची गुळांची उलाढाल झाली. गुळ सौद्यात नेहमीच्या व्यापाऱ्यांसह इतर व्यापाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. आजच्या या गुळ सौद्यात सरासरी 3700 रुपये इतका दर राहिला. कोल्हापुरात कर्नाटकी गुळाची आवक वाढल्यामुळे स्थानिक उत्पादकांच्या गुळाला मागणी कमी झाली. त्यामुळे उत्पादकांच्या गुळ सौद्याला योग्य दर मिळत नव्हता. या वादाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस बंद असलेले गुळ सौदे आज पूर्ववत सुरु झाले.
गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून भांडाफोड
दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकात तयार झालेला गूळ हा कोल्हापूरचा गूळ म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असल्याचे समोर आणले. कर्नाटकी गुळाची पोलखोल शेतकऱ्यांनी प्रशासकांसमोर केली होती. ही बाब गंभीर असून यावर कायदेशीरित्या कारवाई करण्याची मागणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांकडे केली होती. त्यामुळे प्रशासकांनी सर्वाधिकरांचा वापर करून या ठिकाणी कारवाई करू असा आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.
फसवणुकीचे गुन्हे दाखल करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कर्नाटकातील गूळ आणून ‘कोल्हापूर’च्या नावावर विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिले आहेत. गुळाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तातडीने उभा करा, शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील. कर्नाटकातील गुळाला आत प्रवेशच द्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेशही दिले आहेत. सोमवारपासून भरारी पथकासह प्रवेशद्वारावरून बाहेरील गुळाला प्रवेश देऊ नका, अशी सूचना त्यांनी समिती प्रशासनाला दिली आहे.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, गूळ सौदे बंद ठेवून कोणाचा लाभ होणार नाही. गूळ सौदे तातडीने सुरू करावेत. कर्नाटकातून येणाऱ्या गुळाला कोल्हापुरी गुळाचा शिक्का मारला जात असेल तर असा प्रकार थांबवावा. बाजार समितीने भरारी पथक स्थापन करून संबंधितांवर कारवाई करावी. या भरारी पथकात बाजार समिती, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घ्यावेत. शेतकऱ्यांनी चांगला गूळ बनवावा. त्याला व्यापाऱ्यांनीही चांगला भाव द्यावा.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
