Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार समोर आले असून दोघांवर कारवाई केल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं.
मुंबई/ नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेद्वारे (Crop Insurance) राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) एक रुपया भरुन सहभागी होता येत होतं. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये या योजनेत गैरव्यवहार झाल्याची प्रकरणं उघडकीस आली होती. यानंतर कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं एक रुपयात पीक विमा योजनेत बदल करुन शेतकऱ्यानं भरावयाची रक्कम 100 रुपये करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती आहे. यामुळं एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का अशाच र्चा सुरु झाल्या होत्या. यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी योजनेचा सर्वस्वी निर्णय कॅबिनेटमध्ये होईल, असं म्हटलं. तर, भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एखाद्या गावात गैरप्रकार झाले असतील तर कडक शिक्षा करा, असं म्हटलं.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
एक रुपयात पिक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याच प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आलं असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी म्हटलं. या प्रकरणी मागच्या 2 दिवसांपूर्वी कहीजणांवर कारवाई देखील करण्यात आली, अशी माहिती देखील त्यांनी दिली. जर पीक विमा योजनेबाबत काही बदल करायचे असतील तर आम्ही त्याचा अभ्यास करू आणि तत्काळ कॅबिनेट मधे हा विषय मांडू, असंही कोकाटे म्हणाले. या योजनेबाबत सर्वस्वी निर्णय कॅबिनेट मधेच होईल, अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एबीपी माझाला दिली.
गैरप्रकार असेल तिथं कडक कारवाई करा : सुधीर मुनगंटीवार
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक रुपयाच्या पीक विमा योजनेनं बोगस पीक विमा येतो असं म्हणनं बरोबर नाही, अशी भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा 1551 कोटी रुपयांचा विमा आपण भरतो. कोणतीही कंपनी 80 टक्के पर्यंत नुकसान भरपाई देत असेल तर आपला हिस्सा कमी होतो. 10-120 टक्क्यांनंतर सारेच पैसे आपण देतो, अर्धा अर्धा हिस्सा आपण देतो. शेतकऱ्यांना आज मिशन जय किसानची आवश्यकता आहे. या क्षेत्राकडे गंभीरपणे लक्ष देणं आवश्यक आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
शेतकऱ्याच्या मुलांनी शेती करणे सोडून दिले तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागते त्यापेक्षा दहा हजार पट अन्नधान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सोनं इम्पोर्ट करणे आवश्यक नाही मात्र अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे आपण नापास झालो, असा अर्थ होईल. आपल्याला 1956-57 मध्ये धान्य आयात करावं लागलं. अन्नधान्य निर्यातदारांच्या यादीत पहिल्या 10 जणांच्या यादीत नाव नाही. मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे. ते करताना कोणताही निर्णय घाई घाईनं, धरसोडीच्या वृत्तीनं करु नये, असं मुनगंटीवार म्हणाले.
चुका कुठं होत नाही, कुणी म्हटलं या विभागात भ्रष्टाचार आहे म्हणून विभाग बंद करा असं होतं का? तुम्ही एक रुपयाच्या पीक विम्यात एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा. हा काही मार्ग नाही की सर्व पीक विमा विषय बंद करायचा. आपल्याला काळजीपूर्वक या क्षेत्रात काम करावं लागेल. अन्यथा या अन्नधान्याच्या निर्मितीत अंधाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.
इतर बातम्या :