Maharashtra and Karnataka Border Dispute : कोल्हापुरातून 24 तासानंतर महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा पूर्ववत; मात्र, सोलापुरातील बसेस रोखल्या
कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून काल आंदोलन करण्यात आल्यानंतर दोन्ही राज्यांमधून होणारी एसटी बससेवा थांबवण्यात आली होती. एबीपी माझाने मुद्दा उपस्थित केल्यानंतर सेवा पूर्ववत झाली आहे.
Maharashtra and Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुका आणि सोलापूर जिल्ह्यावर दावा सांगितल्यानंतर चांगलेच रणकंदन माजले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून काल आंदोलन करण्यात आल्यानंतर दोन्ही राज्यांमधून होणारी एसटी बससेवा थांबवण्यात आली होती. एबीपी माझाने मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोन्ही राज्यांमधून एसटी सेवा 24 तासांनी सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सीबीएस स्थानकातून सीमाभागातील बेळगाव, निपाणीच्या दिशेने रवाना एसटी बसेस रवाना झाल्या.
सोलापूर डेपोच्या एसटी कर्नाटक हद्दीत अडवल्या
दरम्यान, कोल्हापूरमधून एसटीसेवा पूर्ववत झाली असली, तरी सोलापूर आगारातील महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटक हद्दीत अडवल्याचे समोर आले आहे. कर्नाटक पोलिसांनी या बसेस अडवल्याचे समोर आले आहे. सोलापूर-गुलबर्गा मार्गावरील हिरोळीजवळ तीन बसेस आणि दुधणीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन बसेस रोखल्याची माहिती आहे. कर्नाटकच्या बसवर काळे फासल्याने आणि घोषणा लिहिल्याने कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. शनिवारी अकरा वाजल्यानंतर कर्नाटक बससेवा सुरू करण्यात आली आहे. बससेवा सुरू झाल्याने नोकरी ,उद्योगासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी दौंड येथे कर्नाटकच्या बसला काळे फासल्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबूर्गी येथे काळे फासण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकने महाराष्ट्रात जाणाऱ्या बस तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या. कलबुर्गी येथे महाराष्ट्राच्या बसला काळे फासल्यावर महाराष्ट्राने देखील कर्नाटकात जाणाऱ्या बस तात्पुरत्या थांबवल्या होत्या. आता महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि अन्य गावांना जाणाऱ्या बस पुन्हा कर्नाटकने सुरू केल्या आहेत. कोल्हापुरातून बेळगाव, निपाणीसाठी बसेस रवाना झाल्या आहेत.
शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांचा तिरडी मोर्चा
दरम्यान, कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांचा तिरडी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला असा काढण्यात येत होती. दरम्यान, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर केलेल्या दाव्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील एसटी बससेवा ही बंद केली होती. कोल्हापुरात सीबीएस स्थानकातील कर्नाटकच्या बस गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकच्या बस गाड्या महाराष्ट्रात येऊ न देण्याचे आवाहन एसटी प्रशासनाला केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या