कर्नाटकची आगळीक, सीमाप्रश्नाच्या विरोधात एकमताने ठराव मंजूर, महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा बसवराज बोम्मईंचा पुनरुच्चार
Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटक विधानसभेमध्ये सीमाप्रश्नाच्या विरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून सीमाप्रश्न संपल्याचं त्यात म्हटलं आहे.
बेळगाव: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला.
Basavraj Bommai On Maharashtra: महाराष्ट्रातील नेते वातावरण बिघडवत असल्याची टीका
महाराष्ट्रातील नेते बेळगाात येऊन वातावरण बिघडवत असल्याची टीकाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद आता उरला नसून कर्नाटकातील सीमाभागात सगळे काही सुरळीत चालले आहे असंही ते म्हणाले. कर्नाटकच्या विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, "राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्याची पुनर्रचना होताना जनतेच्या भावना जाणून घेऊन राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. महाजन अहवाल हाच अंतिम आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली होती तो उद्देश बाजूला गेला आहे. समितीला कोणाचाही पाठिंबा उरलेला नाही"
Basavraj Bommai On Maharashtra: कर्नाटकडे वक्रदृष्टाने पाहिल्यास... बोम्मईंचा महाराष्ट्राला इशारा
कर्नाटकाची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नसल्याच्या भूमिकेचा बोम्मई यांनी ठराव मांडताना पुनरुच्चार केलाय. यापुढील काळात कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी महाराष्ट्राला दिला. बोम्मईंनी कर्नाटकच्या सभागृहात महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्तनाचा निषेध करणारा निषेध ठराव मांडला आणि सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
Basavraj Bommai On Sanjay Raut, Jayant Patil: संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यावर टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनानिमित्त कर्नाटकात कार्यक्रम असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांना आम्ही अडवलं असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. महाराष्ट्रातील नेते मंडळी रंग बदलत असून येथील कायदा सुव्यवस्था त्यांच्यामुळेच बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महाराष्ट्राच्या नेत्याकडून वारंवार होणाऱ्या वक्तव्यांचा निषेध करत संजय राऊत, जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली.
अधिवेशन सुरू असताना महामेळवा आणि राज्योत्सवदिनाच्या काळातील आंदोलनं या दोन्ही गोष्टी येथील परंपरा झाल्याचं सांगत पुन्हा एकदा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाची बाजू समर्थपणे मांडण्यास आपण तयार आहोत, कर्नाटकची बाजू भक्कम असल्याचं बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या सभागृहाला सांगितलं.