Toor Dal Price Hike : तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले
Toor Dal Price Hike : आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा 175 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे.
![Toor Dal Price Hike : तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले Latur News Toor Dal is 175 rupees per kg the prices of all pulses gone up Toor Dal Price Hike : तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/03/30fb4361abf818e4b1112348b3cbfb3f1685766790427666_0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळीने तर रोज दराचा उच्चांक गाठण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची अत्यल्प आवक आहे. मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहेत. बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची बाजारात खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा 175 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ (Toor Dal) महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत 100 ते 110 रुपयांवरुन 160 ते 170 रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ 57 ते 58 रुपयांवरुन 70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. उडीद डाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूग डाळ 80 ते 85 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे.
देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. गेल्या वर्षी 25 ऑगस्ट अखेर देशात 128.07 लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती. यंदा ती 117.44 लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड 42.11 लाख हेक्टर, उडीद 31.10 लाख हेक्टर, मूग 30.64 लाख हेक्टर, कुळीथ 0.26 लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची 13.34 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढील वर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
बाजारात भाव मात्र शेतकऱ्यांकडे माल नाही
बाजारामध्ये सध्या तूर आणि हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली होती. बाजारात हरभऱ्याला भाव नव्हता हमीभाव केंद्रावर उत्तम भाव होता. या कारणासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या हरभरा हमीभाव केंद्राला विकला. भारतात एकूण 95 लाख मॅट्रिक टन हरभराचे उत्पादन झाले होते. त्यापैकी 30 लाख मॅट्रिक टन हरभरा ची खरेदी सरकारने केली आहे. तुरीला आणि हरभऱ्याला आता बाजारभाव उत्तम मिळत असला तरी शेतकऱ्याकडे मालच नसल्याने आवक अत्यल्प आहे.
रोज बदलणाऱ्या भावामुळे किरकोळ व्यापारी हैराण
तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ हरभरा डाळ मसूर डाळ याचे भाव दर दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात माल विकतही नाही आणि किरकोळ व्यापारी खरेदी करताना प्रचंड ताणात आहे. रोज बदलणाऱ्या भावामुळे ग्राहकांवरही त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे.
भाव कमी होण्याची चिन्ह नाहीत
गेल्या वर्षी कमी झालेली डाळीची लागवड अनियमित पाऊसमान याचा डाळीचे उत्पादनावर झालेला परिणाम आणि यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातही पावसानं दिलेली ओढ याचा थेट परिणाम शेतमाल उत्पादनावर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशांमध्येच डाळीचे उत्पादन यावर्षी कमी प्रमाणात आहे. याचा थेट परिणाम बाजारातील भाव वाढीवर झाला आहे. पाऊस पडेल आणि उत्पादन चांगले येईल अशी स्थिती आता राहिली नाही. पावसाने दिलेल्या ओढीमुळे उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. पुढील हंगामातच उत्पादनाची शक्यता असल्याने सर्व प्रकारच्या डाळीची भाव वाढ झाल्याचं बोललं जातं आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)