Devendra Fadnavis : 100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल, रिपोर्ट कार्डचे प्रकाशन
Energy Department 100 Days Report card : ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी 'हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स' हे प्रगती पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबई येथे 100 दिवसांच्या आराखड्यानुसार ऊर्जा विभागाअंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 25 वर्षांच्या राज्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याची योजना निश्चित केली आहे. त्यानुसार 100 दिवसांच्या आराखड्याअंतर्गत वीजविषयक सार्वजनिक कंपन्यांसाठी विविध उद्दिष्टे ठरविण्यात आली होती. त्यांची माहिती व ती किती पूर्ण झाली याचा लेखाजोखा देणारे ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ हे प्रगती पुस्तक महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी लिहिले आहे.
100 दिवसांच्या आराखड्याअंतर्गत, महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल करून वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पंप बसवणे तसेच प्रधान मंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याबाबत उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी झाली आहे. 100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल ठरला आहे. तसेच कामगिरीचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाने स्वतःपासून केली आहे.
एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीवेळी पुस्तकाचे प्रकाशन झाले. बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डिकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग सचिव, महावितरणचे अध्यक्ष, महापारेषणचे अध्यक्ष, महानिर्मितीचे अध्यक्ष, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे वित्त संचालक व स्वतंत्र संचालक उपस्थित होते.
महापारेषणची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यासोबतच पालघर येथे जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करण्याचे, वाढवणच्या दृष्टीने टीबीसीबी (Tariff Based Competitive Bidding) प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करण्याचे तसेच 'नवी मुंबई डेटा सेंटर हब'ला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला न जूमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधिक्षकांनी पोलिस सरंक्षण उपलब्ध करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांचे काम गतीने पूढे नेण्याची खबरदारी घेण्याचे देखील त्यांनी यावेळी आदेश दिले.
राज्यात वीजेची वाढीव मागणी लक्षात घेता सर्व क्षेत्रांना आवश्यक वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे असून कामांची अमंलबजावणी अधिक गतीमान करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
