Ichalkaranji: इचलकरंजीची नवीन ओळख MH51, परिवहन खात्याची मंजुरी; शहराला एका वर्षात दोन गिफ्ट
इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना त्यामुळे यश आले आहे.
Ichalkaranji: महाराष्ट्राची वस्त्रोद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) इचलकरंजी शहराला आणखी एक ओळख मिळाली आहे. शिंदे सरकारकडून इचलकरंजी महापालिका म्हणून दर्जा मिळाल्यानंतर आता MH 51पासिंगसाठी मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराची आणखी एक ओळख झाली आहे. परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना त्यामुळे यश आले आहे. या संदर्भातील जीआर जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून इचलकरंजीकरांना एका वर्षात दोन गिफ्ट मिळाले आहेत. शहराला महानगरपालिका आणि परिवहन खाते मंजूर केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काय म्हटलं आहे शासन निर्णयात?
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एमएच 51 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरंजी (जि. कोल्हापूर) या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील. तूर्तास सदर कार्यालयासाठी विहित मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियमानुसार करावी.
सदरील नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका यांची जागा भाडेतत्त्वावर जागा घेण्याचे पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तत्काळ करावी. सदर नवनिर्मित कार्यालयासाठी एक इंटरसेप्टर वाहनास मंजुरी देण्यात येत आहे. सदर वाहन घेण्यापूर्वी वाहन आढावा समितीची मान्यता घेण्यात यावी. सदर कार्यालयासाठी येणारा अंदाजित आवर्ती खर्च व अनावर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करून देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव परिवहन आयुक्ताने शासनास सादर करावा. तोपर्यंत सदर खर्च उपलब्ध कार्यालयीन खर्चातून भागविण्यात यावा
इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत झाले आहे. इचलकरंजी राज्यातील 28 वी महापालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी आहे. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळेच इचलकरंजी ही महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. इचलकरंजी हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते.
इतर महत्वाच्या बातम्या