अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत महायुती सरकारमधील मंत्र्याचं स्पष्ट मत
पत्रकारांनी अजित पवारांना मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता.

मुंबई : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं असून आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना, तसेच स्वत:देखील धनंजय मुंडेंवर खंडणीप्रकरणी मदत केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतरही सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सुरेश धस यांच्या भेटीवर आक्षेप घेत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. मात्र, धनंजय मुंडेंवर (Dhananjay munde) शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं स्पष्टीकरण धस यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता, मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकारांनी अजित पवारांना मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता. त्यामुळे, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे, असे म्हणत अजित पवारांनी राजीनाम्याचा विषय धनंजय मुंडेंच्या कोर्टात ढकलला आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यायचा निर्णय अजित पवारांचा आहे, असे म्हटले होते. तर, आता अजित पवार धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवावी, असे म्हणत आहेत. मात्र, पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे, असा सूर राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे.
अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन आता राजकीय वर्तुळात आणि महायुतीमधील मंत्र्यांमध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे. महायुती सरकारमधील मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे शिलेदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली आहे. पक्षात दोन भूमिका घेऊन चालत नाही, कुणाला काढायचे याचे अधिकार त्यांना आहेत. पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे, असे म्हणत अजित पवारांनीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

