सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार?
Satara Politics : सातारा जिल्ह्यातील कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाना म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत सुरु आहे. या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अखेर विरोधकांमध्ये दुफळी निर्माण झाली असून या कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. विशेष बाब म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमधील गट स्वतंत्रपणे भूमिका घेत एकत्र आलेत. भाजपचे नेते कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं पॅनेल देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सत्ताधारी, माजी सहकार मंत्र्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेस आणि भाजपात बिघाडी झाली आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने तिरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटाविरोधात भाजप आणि काँग्रेस यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये बिघाडी झाल्याने तिरंगी लढत होणार आहे.
भाजपच्या दोन नेत्यांची स्वतंत्र पॅनल
सत्ताधाऱ्यांविरोधात विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांचे पॅनेल असणार आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष निवास थोरात या तिघांचे मिळून एक पॅनेल असणार आहे. या तिरंगी लढतीमुळे आता मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून जोरदार वातावरण निर्मितीचा करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये विरोधातील दोन प्रमुख पॅनेलमध्ये एकमत न झाल्यानं तिरंगी लढत पार पडतेय. एकूण 214 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 144 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळं आता 21 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात असतील.
बाळासाहेब पाटील विधानसभेचा वचपा काढणार?
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून बाळासाहेब पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी त्यांना भाजपच्या मनोज घोरपडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून विरोधकांना उत्तर देणं बाळासाहेब पाटील यांच्यासाठी महत्त्वाचं असेल. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी 5 एप्रिलला मतदान होणार असून 6 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, सहकार क्षेत्रातील निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसून त्यासाठी पॅनल तयार करुन निवडणूक लढवावी लागते.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

