Paddy Crop Farmer : शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला! विद्युत पुरवठ्याअभावी धान पीक संकटात, पाण्याअभावी रब्बी हंगामातील उभी पीकं करपली
Gondia News : शेतात मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान पीक (Paddy Crop) करपल्याची विदारक परिस्थिती गोंदियाच्या मोहगाव तिल्ली येथे निर्माण झाली आहे.

Gondia News : शेतात मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान पीक (Paddy Crop) करपल्याची विदारक परिस्थिती गोंदियाच्या मोहगाव तिल्ली येथे निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातही रब्बी धानाची 10 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. र
ब्बी हंगामातील रोवणी आटोपली असून, धानाला पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कृषिपंपाद्वारे पाणी करून पीक घेतात. पण कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यात कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, तर कधी कमी विद्युत दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीला सिंचन करणे कठीण झाले आहे.
पाण्याअभावी रब्बी हंगामातील उभी पीकं करपली
गोरेगाव तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात लावलेला धान गर्भावस्थेत असताना पाण्याअभावी करपत असल्याचे पाहून चक्क हिरवा धान कापणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तर मोहगाव तील्ली येथील अन्य शेतकऱ्यांची जवळपास 45 ते 50 एकर शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. एक महिन्यांपासून विद्युत रोहित्र बंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क केले असता शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मागेल त्याला सोलार पंप योजना फक्त कागदावरच, शेतकरी हवालदिल
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धान पिकाची लागवड केली होती. मात्र, अपुऱ्या विद्युत पुरवठा अभावी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष बघायला मिळत आहे. दुसरीकडे मागेल त्याला सोलार पंप योजना फक्त कागदावरच असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पैसे भरूनही सहा महिन्यापासून सोलार पंप मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात 17 हजार शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलर पंप मिळालेले नाही, कधी मिळणार याबाबतही शेतकऱ्यांना स्पष्टता ही नाही. तर जिल्ह्यात 61 हजार शेतकरी सोलार पंपासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेत अडकले असल्याचे चित्र आहे. परिणामी, सोलार पंप कंपनी निवडणे, स्पॉट सर्वे रखडले आहे. तसेच मुख्यमंत्री सौर पंप योजना, कुसुम योजनेतील अर्जदार शेतकरीही सोलर पंपासाठी वेटिंग वरच असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

