Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Ajit Pawar on Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीच्या वादावरून अजित पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच नितेश राणे यांचे देखील अजित पवार यांनी कान टोचलेत.

Ajit Pawar on Aurangzeb Tomb Row : मुघल शासक औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याची तयारीही केली होती. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली होती. तर औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे देखील गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच नितेश राणेंचे देखील अजित पवारांनी कान टोचले आहे.
समाजात गैरसमज निर्माण करणे आणि समाजात दरी निर्माण करणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतक्या वर्षांनी औरंगजेबाची कबर कशाला उकरता? असे म्हणत अजित पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. तर मंत्री म्हणून काम करत असताना तारतम्य बाळगायला पाहिजे, असे म्हणत अजित पवारांनी नितेश राणे यांचे कान टोचले आहे. आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही, असा टोला देखील अजित पवार यांनी नितेश राणे यांना लगावला आहे.
इतक्या वर्षांनी कबर कशाला उकरता?
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, महापुरुषांचे आपण ज्यावेळेस नाव घेतो, त्यावेळेस त्यांनी इतक्या वर्षापूर्वी कसं सगळ्यांना बरोबर घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केले आहे. आज आपल्याकडे अनेक जाती धर्मांची लोक आहेत. कारण नसताना एकमेकांच्या बद्दल गैरसमज निर्माण करणे, एकमेकांबद्दल दरी निर्माण करणे हे काही मला बरोबर वाटत नाही. कधीकाळी त्यांना तेथे दफन करण्यात आलं, त्याला आता किती वर्ष झाली, इतकी वर्ष झाल्यानंतर आताच कशाला हे उकरून काढायचे? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
मंत्र्यांनी तारतम्य बाळगावं, अजित पवारांचा नितेश राणेंना टोला
अजित पवार पुढे म्हणाले की, ज्यावेळेस आपण मंत्री म्हणून काम करतो, त्यावेळेस तो कुठल्याही पक्षाचा, गटाचा, तटाचा असला तरी त्यांनी व्यक्तव्य करत असताना तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. आपल्या वक्तव्यामुळे आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडेल, पोलीस दलाला आधीच भरपूर काम असतात, त्याच्यात हे नवीन काम आणखीन त्यांच्या पाठीमागे लागेल, असे काही करू नये, असा टोला त्यांनी यावेळी नितेश राणे यांना लगावला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

