Shivsena Shinde Camp Vs Thackeray Camp: वाघांच्या कळपात या! महिनाभरात मोठे बदल होतील; भास्कर जाधवांना शिंदे गटाच्या नेत्याची जाहीर ऑफर
Shivsena Shinde Camp: रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला राजन साळवी यांच्यापाठोपाठ आणखी एक धक्का बसणार? भास्कर जाधव हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर: भास्कर जाधव यांच्या 'म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात', या सोशल मीडियावरील स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट शिवसेनेत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadahv) यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, अशी भास्कर जाधव यांची मानसिकता झाली आहे. किती सत्यता आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या माणसावर आरोप केल्यावर कसे सहन करणार. जाधव तिथे राहणार नाहीत. भास्कर जाधव यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे येत्या महिनाभरात मोठे बदल होतील, असे भाकीत संजय शिरसाट यांनी वर्तविले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय शिरसाट यांनी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना भाजपचे सदस्य बनवून घ्या, असे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केले होते. याबाबत बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटले की, ही योजना सर्वसामान्य बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. याचा वापर महिलांना पक्षात घेण्यासाठी करु नका, असे करणे गैर आहे. ही योजना सरकारची आहे. सरकार योजनेच्या माध्यमातून कोणतेही उपकार करत नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. एका हाताने घेऊन दुसऱ्या हाताने घेऊ नये. भाजपचे हे वागणे चुकीचे आहे, असे परखड मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत संजय शिरसाट म्हणाले...
यावेळी संजय शिरसाट यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा की नाही, हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे असे म्हटले होते. याबाबत बोलताना शिरसाट यांनी सांगितले की, पक्षात दोन भूमिका घेऊन चालत नाहीत. कुणाला काढायचे त्याचे अधिकार अजित पवारांना आहेत. पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे, असे शिरसाट यांनी म्हटले.
तसेच आदित्य ठाकरे कधीपासून नेते झाले? खासदारांनी स्नेहभोजनाला परवानगी घेऊन जावे, असे वक्तव्य करुन आदित्य ठाकरे राजकारण करत असतील तर तो लाचारीचा कळस आहे. त्यांनी मातोश्रीची इज्जत घालवली, आमचं चुकलं हे सांगायचं धाडस लागते. ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. मी स्वतः किनवटला गेलो, यादी करण्याचे काम सुरू आहे, आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.
उपमुख्यमंत्री सहायता कक्षाच्या स्थापनेवरुन वाद, संजय शिरसाट म्हणाले...
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या धर्तीवर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरु केल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना शिरसाट यांनी म्हटले की, मुख्यमंत्री यांनी सीएसआर फड आपल्याकडे घेतला असेल, तर ते चुकीचे आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन वेगवेगळे फंड केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी जी काही मदत दिली, आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा शिंदे यांची आहे. तातडीने मदत देण्याच काम त्यांनी केलं आहे. पुन्हा अशी योजना सुरू करत असेल तर स्पर्धा नाही. पालकमंत्री पदावरुन निर्माण झालेला वाद लवकरच संपेल. मुख्यमंत्री निधीसाठी निधी निश्चित मी देणार आहे. कोणतेही वॉर नाही, सर्वांनी मदत केली पाहिजे, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.
आणखी वाचा
कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा शेवटचा शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

