सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप, यामागे मोठं षडयंत्र असू शकतं : सरन्यायाधीश रंजन गोगोई
मी कधीही आर्थिक गैरव्यवहारात सापडू शकत नसल्याने असे आरोप केले आहेत, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधातील एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. याबाबत काही न्यूज वेबसाईट्सवर बातम्या प्रसारित झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज या आरोपाची सुमोटो दखल घेत सुनावणी केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
माझ्यावर विनयभंगाचा आरोप अविश्वसनीय आहे. महिलेने केलेले आरोप नाकारुन त्यांना महत्व देण्याचीही माझी इच्छा नाही. मात्र या आरोपांमागे मोठे षडयंत्र असल्याचं मला वाटत आहे. न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. मी कधीही आर्थिक गैरव्यवहारात सापडू शकत नसल्याने असे आरोप केले आहेत, असं सरन्यायाधीश म्हणाले.
न्यायपालिकेत 20 वर्ष सेवा केल्यानंतर माझ्या बँकेत 6 लाख 80 हजार रुपये जमा आहे. पुढील महिन्यात काही महत्वाच्या खटल्यांचा निकाल आहे. मात्र पैशांच्या आधारे माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने जाणीवपूर्वक सर्वोच्च न्याय संस्थेला बदनाम करण्याचा हा डाव असू शकतो. यामागे कोणीतरी मोठ्या शक्तीचा हात असू शकतो आणि मोठं षडयंत्र असू शकतं. काही शक्तींना माझ्याविरोधात काहीच मिळत नसल्याने त्यांनी आता एका महिलेचा आधार घेत माझ्यावर आरोप केले, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं.
VIDEO | सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप, रंजन गोगोईंकडून आरोपांचं खंडण | एबीपी माझासर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या एका महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. सध्या ही महिला न्यायालयात कार्यरत नाही. लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तसेच काही दिवस ती जेलमध्येही होती.
संबंधित महिलेने केलेले सर्व आरोप बदनामी करणारे व बिनबुडाचे आहेत. याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीशांवर आरोप करणारे पत्र या महिलेने अनेक न्यायाधीशांना पाठवले असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
