(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात सर्वाधिक 56 हजार कोट्यधीश, देशात ही संख्या 4.12 लाख
हुरुन इंडियाने देशातील कोट्यधीशांची यादी प्रसिद्ध केली असून सर्वाधिक कोट्यधीशांच्या संख्येत महाराष्ट्र अव्वल आहे.
मुंबई : देशात आणि राज्यात नवमध्यम वर्गाची संख्या वाढताना दिसत आहे. हुरुन इंडियाने या नवमध्यम वर्गीयासंबंधी एक अहवाल प्रसिध्द केली असून त्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल 56,000 कोट्यधीश असल्याचं सांगितलं आहे. ही संख्या देशात सर्वोच्च आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक लागतोय.
देशात एकूण 4.12 लाख कोट्यधीश राहतात असंही या अहवालातून स्पष्ट झालंय. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या पाच राज्यांत देशातील एकूण 46 टक्के कोट्यधीश राहतात असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. महाराष्ट्रात एकूण 56 हजार कोट्यधीश आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये 36 हजार कोट्यधीश आहेत. तामिळनाडू या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून या राज्यात 35 हजार कोट्यधीश राहतात. कर्नाटक या राज्यात जवळपास 33 हजार कोट्यधीश तर गुजरातमध्ये 29 हजार कोट्यधीशांची संख्या आहे.
या पाच राज्यांच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये 24 हजार तर राजस्थानमध्ये 21 हजार आणि आंध्रमध्ये 20 हजार कोट्यधीशांची संख्या आहे.
हुरुन इंडियाकडून दरवर्षी देशातील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये सांगण्यात आलंय की गेल्या वर्षी देशात एकून 4.12 लाख कोट्यधीश होते. एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक मिलियन डॉलर्स, भारतीय रुपयात सांगायचं तर जवळपास सात कोटी रुपये असेल तर त्या कुटुंबाला मिलियन डॉलर्स कुटुंब म्हणतात. महाराष्ट्राचा विचार करता भारताच्या जीडीपीच्या 16 टक्के जीडीपी एकट्या महाराष्ट्रातून येतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक घडामोडीत राज्याचे महत्व हे अव्वल आहे.
काही दिवसापूर्वी हुरुन इंडियाने भारतातील श्रीमंतांची यादी प्रसिध्द केली होती. त्यामध्ये जवळपास 83 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेले रिलायन्सचे मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या वेळी जागतिक श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी हे आता आठव्या स्थानी पोहचले आहेत. कोरोना काळात त्यांच्या संपत्तीत 24 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Ratan Tata | रतन टाटा आता लेन्सकार्टची साथ सोडणार, पाच वर्षात कमावला एवढा फायदा