America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहेत. यामध्ये 2019 मध्ये सर्वाधिक 2042 आणि 2020 मध्ये 1889 जणांना हद्दपार करण्यात आले.

America on Indian Migrants : अमेरिकेत अवैध नागरिकांची धरपकड सुरु करण्यात आल्यानंतर यामध्ये भारतीय सुद्धा पकडण्यात आले. अमेरिकन लष्करी विमानाने भारतीयांची पहिली 104 जणांची तुकडी भारतात परतली. मात्र, त्यांच्या हातापायात साखळदंड पाहून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी ते अवैध प्रवासी असले, तरी त्यांना त्या पद्धतीने वागवण्याची ही पद्धत नसल्याचे सुद्धा दाखवून दिले. मात्र, अमेरिकन कोअर व्होट बँकेला खूश करण्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतही कसर सोडलेली नाही. भारताची सुद्धा मवाळ भूमिका चर्चेचा विषय ठरला असून अमेरिकेला शरण कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. अणुकरार करताना स्वर्गीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतलेली कणखर भूमिका तसेच देवयानी खोब्रागडे प्रकरणात दिलेली जशास तसेची वागणूक याची सुद्धा अनेकांनी आठवण करून दिली.
कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाईल
आता दुसऱ्या अमेरिकेने 487 अवैध स्थलांतरितांना भारतात पाठवण्यासाठी यादी तयार केली आहे. त्यापैकी सुमारे 298 जणांची माहिती देण्यात आली आहे. 4 फेब्रुवारी रोजी 104 अवैध अनिवासी भारतीयांना भारतात पाठवण्यात आले होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, भारतीयांना पाठवताना कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. असा कोणताही मुद्दा आमच्या निदर्शनास आला तर आम्ही तो अमेरिकेसमोर मांडू. मिसरी म्हणाले की, भारतीयांना भारतात पाठवताना त्यांच्याशी गैरवर्तणूक होत असल्याचा मुद्दा त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. निरपराध लोकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवून त्यांची दिशाभूल करणे हा कर्करोगासारखा आजार असल्याचे त्यांनी सांगितले. असे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार
दरम्यान, गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहेत. यामध्ये 2019 मध्ये सर्वाधिक 2042 आणि 2020 मध्ये 1889 जणांना हद्दपार करण्यात आले. 2009 ते 2014 या कालावधीत 3 हजार 210 जणांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. 2009 ते 2025 या कालावधीत 15 हजार 756 जणांना हद्दपार करण्यात आले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेतून निर्वासित 104 भारतीयांना घेऊन आलेले अमेरिकन सैन्याचे सी-17 विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरले. या लोकांच्या पायाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या, तर त्यांचे हातही साखळदंडाने बांधलेले होते. यूएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल बँक्स यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीयांच्या हातापायात बेड्या स्पष्टपणे दिसत आहेत.
अमेरिकेत 7.25 लाख अवैध स्थलांतरित
प्यू रिसर्चनुसार, अमेरिकेत 7 लाख 25 हजाराहून अधिक अवैध स्थलांतरित भारतीय राहतात. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने नोव्हेंबर 2024 मध्ये अहवाल दिला की त्यांनी आतापर्यंत वैध कागदपत्रांशिवाय 20,407 भारतीय ओळखले आहेत. यापैकी 2,467 भारतीय इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट (ICE) अटक केंद्रात तुरुंगात होते. त्यापैकी 104 जणांना नुकतेच भारतात पाठवण्यात आले. याशिवाय 17,940 भारतीय आहेत ज्यांना अटक करण्यात आलेली नाही, पण त्यांच्या पायात डिजिटल ट्रॅकर (एंकल मॉनिटर) बसवले आहेत. ICE त्यांचे स्थान 24 तास ट्रॅक करते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
