Pedgaon Gram Panchayat : गावात एनर्जी ड्रिंक्स आणि शितपेयांवर बंदी, पेडगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय
Ban On Cold Drinks : लहान मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक्स आणि शितपेयांच्या सेवनाचे प्रमाण वाढत असून त्याचा परिणाम हा आरोग्यावर होत असल्याने पेडगाव ग्रामपंचायचीने हा निर्णय घेतला आहे.

अहिल्यानगर: ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामस्थांच्या हिताचे वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केलेले आपण पाहिले आहेत. ठरावाच्या माध्यमातून गावातील एकी दाखवत गावामध्ये बदल घडवण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं जातं. अशाच प्रकारचा एक वेगळा ठराव अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने केला आहे. लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
उन्हाचे चटके जसे जाणवू लागतात तसं तसे शीतपेयांची मागणी वाढते. मात्र लहान मुलांसाठी ही शीतपेय घातक ठरतात. त्यामुळे ग्रामपंचायतने घेतलेल्या या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाच स्वागत केलं असून आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केली जात नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव हे साधारणपणे 8 हजार लोकवस्ती असलेलं गाव. या गावामध्ये तीन शाळा आहेत आणि जवळपास 1 हजार विद्यार्थी आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने गावातील छोटे मोठे व्यावसायिक खाऊ बरोबरच शीत पेय आणि एनर्जी ड्रिंक्सची देखील विक्री करतात.
एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनावमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यू
काही दिवसापूर्वी गावातील एका विद्यार्थ्याचा एनर्जी ड्रिंकच्या अति सेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. यातूनच गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंकच्या विक्रीला विरोध सुरू झाला. ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी देखील या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत महिलांची विशेष ग्रामसभा बोलावली आणि ग्रामसभेमध्ये पेडगाव येथे कोणत्याही व्यावसायिकाला एनर्जी ड्रिंक आणि शीतपेय विक्री करता येणार नाही अशा प्रकारचा ठराव मंजूर केला. या ठरावाचं व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी देखील स्वागत केलं आणि अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला.
शाळकरी मुलांमध्ये शितपेय पिण्याचं प्रमाण जास्त
लहान वयातील शाळकरी विद्यार्थी पालकांकडून खाऊसाठी पैसे घेतात आणि एनर्जी ड्रिंक घेऊन पितात. हे एनर्जी ड्रिंक जास्त सेवन करणे लहान मुलांसाठी हानिकारक आहे. पेडगाव ग्रामपंचायतने ठराव केल्यानंतर गावातील व्यावसायिकांनी देखील एनर्जी ड्रिंक किंवा शीतपेय हानिकारक असल्याचे निर्णयाचे स्वागत करत दुकानांमध्ये विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय व्यावसायिकांनी मान्य केला तसा ग्रामस्थांनीही मान्य केला. लहान मुलांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी देखील स्वागत केलं आहे.
पेडगाव ग्रामपंचायत शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी घालून गावात चांगल्या आरोग्यासाठी कामाची सुरुवात केली आहे. आगामी काळात गावात अजूनही नवनवीन उपक्रम राबवले जातील ज्यांचा आदर्श इतर ग्रामपंचायत घेतील.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
