जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
प्रशांत कोरटकर दुबईला फरार झाल्याचे समजताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला. सुषमा अंधारे यांनीही नाकर्ते सरकार असल्यावर काय होणार? अशी प्रतिक्रिया दिली.

Prashant Koratkar : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला फरार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर पोलिसांकडून कोल्हापूर ते नागपूर असा दौरा सुरू असला तरी प्रशांत कोरटकर अजूनही हाती लागलेला नाही. प्रशांत कोरटकर दुबईला फरार झाल्याचे समजताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही नाकर्ते सरकार असल्यावर काय होणार? अशी प्रतिक्रिया दिली.
आता याच्या मुसक्या आवळा
अमोल मिटकरी म्हणाले की, प्रशांत कोरटकर फरार झाल्याने नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पहिल्यांदा माझा आवाज नाही म्हणाला, नंतर त्याचाच आवाज असल्याचे सिद्ध झाले. यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला. यापूर्वीही कोरटकर पळून जाणार होता इंदूरला, त्याने इंडिगोचे तिकिट बुक केले होते, असा दावाही त्यांनी केली. नागपुरात दंगल घडल्यानंतर त्याचाच फायदा घेत कोलकातामार्गे दुबईला फरार झाल्याचे समोर येत आहे. त्याचा गुन्हा देशद्रोहापेक्षा भयंकर असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता याच्या मुसक्या आवळा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे.@CMOMaharashtra
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2025
नाकर्ते सरकार असल्यावर काय होणार
सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, नाकर्ते सरकार असल्यावर काय होणार? प्रशांत कोरटकरला पोलिस संरक्षण दिलं गेलं. तो पोलिस संरक्षणात फरार झाला आहे. भगतसिंह कोश्यारीपासून राहुल सोलापूरकरपर्यंत घटना घडत आहेत. आपल्या महापुरुषांचं ठरवून अवमुल्यन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महारांविरोधात भाजपच्या मनात कमालीचा द्वेष आहे. यातूनच कोरटकरला मोकळी दिल्याचा आरोप त्यांनी केला.
वरिष्ठ पोलिसांच्या मदतीने नागपुरातून दुबईला पळाल्याची चर्चा
दुसरीकडे प्रशांत कोरटकर नागपूर पोलिसांमधील वरिष्ठ पोलिसांच्या मदतीने नागपुरातून दुबईला पळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागपूरमधील कोरटकरचा ''आका' कोण असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, कोल्हापूर सत्र न्यायालयातून त्याचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला आहे. दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्या जामीन अर्जावर उद्या (23 मार्च) सुनावणी होणार आहे. जामीन संरक्षण नसतानाही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकर गेला कुणीकडे असाच प्रश्नचिन्ह गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. कोरटकर मुद्यावर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरचा चिल्लर असा उल्लेख केला होता. मात्र, हा 'चिल्लर' सापडत नसल्याने पोलिसांच्या आणि गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

