Haryana Election Result : काँग्रेसचं नेमकं काय चुकलं, हरियाणा दोन वेळा जिंकवून देणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्याकडून परखड विश्लेषण,लेखा जोखा मांडला
Haryana Assembly Election Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचं विश्लेषण काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी केलं आहे.
मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election) विजय मिळवत भाजप (BJP) सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता असल्यानंतर त्यांच्या बद्दल असलेल्या अँटी इन्कबन्सीचा फायदा करुन घेण्यात काँग्रेसला (Congress) अपयश आलं. भाजपनं 48 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. तर, काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला. हरियाणामध्ये झालेल्या या पराभवाचं विश्लेषण काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी केलं आहे. विशेष बाब म्हणजे मार्गारेट अल्वा या हरियाणा राज्याच्या सरचिटणीस आणि प्रभारी असताना काँग्रेसनं 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.
मार्गारेट अल्वा काय म्हणाल्या?
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांनी काँग्रेसच्या हरियाणातील पराभवानंतर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं आहे. त्या म्हणाल्या, की हरियाणातील निकाल निराशाजनक आहेत. जेव्हा हरियाणा राज्याची सरचिटणीस आणि प्रभारी म्हणून काम करत होते तेव्हा 2004 ते 2009 मध्ये काँग्रेसनं दोनवेळा सत्ता मिळवली होती.आपल्याला निवडणुकीत विजय मिळवायचा असल्यास पक्षामध्ये एकजूट आणि तटस्थता आवश्यकता असते. पक्षाच्या फायद्यासाठी नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वकांक्षा देखील संतुलित ठेवणं आवश्यक असतं, असं मार्गारेट अल्वा म्हणाल्या.
आम्ही या निवडणुकीत वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि पक्षातील एकजूट यामधील संतुलन कायम राखण्यात अपयशी ठरलो. या निवडणुकीत मोठ्या संख्येनं बंडखोर उमेदवार उभे राहिले यातून पक्षातील व्यवस्थापन चांगलं नसल्याचं स्पष्ट झालं. पक्षातील क्षुल्लक भांडणं, खोटं धाडस, समाजातील अनेक घटकांना असुरक्षित करणारी प्रचार मोहीम यामुळं जिंकणाऱ्या निवडणुकीचं पराभवात रुपांतर झालं, असं मार्गारेट अल्वा म्हणाल्या.
मार्गारेट अल्वा यांनी निवडणुकीच्या निकालातील सकारात्मक बाब देखील सांगितली. या निवडणुकीच्या निकालातून भाजपच्या गेल्या 10 वर्षांतील गैरकारभाराबाबत हरियाणाच्या जनतेत असलेला राग कमी होणार नाही, येत्या काळात तो वाढीला लागेल. आपल्या जनतेच्या असंतोषाला दिशा द्यावी लागेल आणि हरियाणातील पुढील वर्षीच्या पंचायत, नगरपालिका निवडणुका जिंकाव्या लागतील. भक्कम विरोधी पक्ष म्हणून देखील काम करावं लागेल, असं मार्गारेट अल्वा म्हणाल्या.
काँग्रेसचा पराभव का झाला?
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जे एक्झिट पोल करण्यात आले होते त्यामध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालामध्ये ते चित्र दिसलं नाही. नेत्यांचा अतिआत्मविश्वास, अंतर्गत गटबाजी, चुकलेली प्रचार मोहीम या शिवाय इतर कारणांमुळं काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही.
मार्गारेट अल्वा यांचं ट्विट
The results in Haryana are disappointing. I was AICC General Secretary in charge of Haryana from 2004 to 2009 when the Congress won the state twice. Winning required staying neutral & unifying the party - striking a balance between individual aspiration & the good of the party.
— Margaret Alva (@alva_margaret) October 9, 2024
इतर बातम्या :