Rohit Sharma IPL 2025: गुजरातमध्ये मुंबईकर रोहित शर्माची खणखणीत मराठी; नरेंद्र मोदी मैदानावर काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma IPL 2025: मुंबई आणि गुजरातच्या सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कसून सराव केला.

Rohit Sharma IPL 2025: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सविरुद्ध भिडेल. मुंबई आणि गुजरातने पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला पंजाब किंग्जने पराभूत केले.
मुंबई आणि गुजरातच्या सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. याचदरम्यान रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. रोहित शर्मा खणखणीत मराठी बोलत असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. याआधी देखील रोहित शर्मा अनेकवेळा मराठीतून बोलताना दिसला. मुंबईकर रोहित शर्माची मराठी गुजरातच्या मैदानात चांगलीच गाजली, असं नेटकरी सध्या सोशल मीडियावर म्हणत आहेत.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?
रोहित शर्माने सरावादरम्यान कॅमेरा हातात घेतला आणि गुजरात टायटन्सच्या संघातील प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे फोटो काढू लागला. यावेळी अरे तुझीच वाट बघतोय, तु पण जा तिकडे...डेडली ग्रुप आहे हा...आशिष नेहरा, सत्यजीत परब, पार्थिव पटेल आणि विक्रम सोलंकी...तुम्ही तिकडे जा...एक फोटो काढायचा आहे, असं रोहित शर्मा मराठीतून बोलताना दिसतोय.
Presenting the Deadly Cameraman - Rohit Sharma 🤣📸#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #GTvMI pic.twitter.com/U0UsNixb3k
— Mumbai Indians (@mipaltan) March 28, 2025
मुंबई की गुजरात, कोणाचं वर्चस्व?
आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 5 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 विजय मिळवले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला दोनदा पराभूत केले. अशाप्रकारे, गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध वरचढ कामगिरी केली आहे. तथापि, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये कशी कामगिरी करते हे पाहणे मनोरंजक असेल. यापूर्वी, मुंबई इंडियन्सचा सध्याचा कर्णधार हार्दिक पंड्याने 2 हंगाम गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. पण आता गुजरात टायटन्सची कमान शुभमन गिलच्या हातात आहे.
𝕊ℍ𝕆𝕎𝕋𝕀𝕄𝔼 🔜 in Amdavad ⚔🍿 #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #GTvMI pic.twitter.com/FeioOiLu1a
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2025
गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अव्वल-
आयपीएलच्या गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2 सामन्यांत 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स नंतर, अनुक्रमे पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आहेत. या संघांचे 2-2 गुण समान आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
