MVA Seat Sharing: मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट, किती उमेदवार फिक्स अन् कोणत्या मतदारसंघांवरुन घोडं अडलं?
Vidhan sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात. मविआच्या आजच्या बैठकीत तिढा असलेल्या जागांबाबत चर्चा होणार आहे.
मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाला वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 240 ते 250 जागांवरील मविआचे जागावाटप (MVA Seat Sharing) पार पडले आहे. तर उर्वरित 40 ते 50 जागांचा तिढा अजूनही सुटला नसून त्याबाबत मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचा निकाल लागल्याने आता महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मविआ आणि महायुतीकडून जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर आटोपण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
महाविकास आघाडीचे नेते बुधवारी विदर्भातील तिढा असलेल्या जागांबाबत चर्चा करणार आहेत. काही जागांवर तिढा कायम राहिल्यास तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तिढा सोडवला जाईल. तर उर्वरित एकमत झालेल्या जागांबाबत मविआकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. जेणेकरुन उमेदवारनिश्चिती आणि पुढील प्रक्रियेला सुरुवात करता येईल. त्यामुळे मविआच्या आजच्या बैठकीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी 100 जागा लढवण्यासाठी आग्रही
शिवसेना ठाकरे गट 100च्या आसपास तर काँग्रेस पक्ष 100पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तिढा पूर्णपणे सुटल्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत. अशा 154 जागा त्याच पक्षांकडे ठेवण्यात आल्या आहेत. अगदी काही मोजक्या जागांवर फेरफार करण्यात आला आहे. उर्वरित 86च्या आसपास जागांबाबत निर्णय घेत असताना 2019च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते, दुसऱ्या स्थानी असलेला पक्ष, निवडून येण्याची क्षमता असलेला पक्ष आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघानुसार मिळालेली मतं या सगळ्याचा विचार करून जागावाटप केले जाईल.
विदर्भातील बहुतेक जागांबाबत मविआच्या नेत्यांमध्ये चर्चा पूर्ण झाली असून आता 10 ते 15 जागांबाबत पुन्हा एकदा आजच्या बैठकीत चर्चा होईल. महाराष्ट्रातील विविध विभागातील ज्या जागांवर तिढा आहे अशा 40 ते 50 जागांमध्ये ज्या जागांचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न बैठकीत होईल. ज्या जागांवर तिढा कायम राहील त्या महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असे सांगितले जाते.
आणखी वाचा