होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
8 ऑक्टोबर 2024 रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि आबादा कंपनीचे मॅनेजर थोपटे यांची बीडमधील जगमित्र कार्यालयामध्ये मीटिंग झाली होती.

बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात आता न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपींचे जबाबही समोर येत आहेत. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख केल्यानंतर आता सुदर्शन घुलेचा सविस्तर जबाब एबीपी माझाच्या हाती लागला आहे. सुदर्शन घुलेने दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाची कहाणीच सांगितली. सरपंच देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी दोन गाड्या वापरण्यात आल्या होत्या, त्यापैकी स्विफ्ट कार अपहरण करण्यासाठी भाड्यानं आणली होती. बीड (Beed) अपहरण करतेवेळी येथील टोल नाक्यावर एक गाडी मागून आणि एक गाडी समोरून लावली होती. तर, संतोष देशमुख यांचे अपहरण करतात वायर, पाईप आणि लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. क्लच वायरने देखील त्यांना मारहाण केल्याची माहिती सुदर्शन घुलेने कबुली जबाबात दिलीआहे.
8 ऑक्टोबर 2024 रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि आबादा कंपनीचे मॅनेजर थोपटे यांची बीडमधील जगमित्र कार्यालयामध्ये मीटिंग झाली होती. त्यावेळी दोन कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही तुमचा प्लांट चालू देणार नाही, अशी धमकीच वाल्मिक कराडे दिली होती. विष्णू चाटेने खंडणीसाठी 29 नोव्हेंबर 2024 रोजी साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दोनवेळा फोन केले. त्यावेळी, वाल्मिक कराड यांच्यासोबत दुर्गा पूजेच्या काळात शिवाजी थोपटे यांच्याशी जे बोलणं झालं आहे, मीटिंगमध्ये ठरलं आहे, त्याप्रमाणे डिमांडबाबत विष्णू चाटेनं बोलणं केलं. परंतु शिंदे नावाचे मॅनेजर टाळाटाळ करत होते. त्यामुळे, तू लगेच प्लांटवर जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजून सांगा, असा आदेशच वाल्मिक कराडाने दिला होता. त्यानुसार सुदर्शन घुले एक वाजण्याच्या सुमारास आबादा कंपनीमध्ये गेला आणि त्याने तसा निरोप दिला.
5 डिसेंबर 2024 रोजीच्या संध्याकाळच्या सुमारास पुन्हा विष्णू चाटेने दोन-तीन वेळा फोन करून सुदर्शन घुलेला सांगितलं की, वाल्मिक अण्णांनी आबादा कंपनीस केलेली मागणीची डिमांड अद्यापही पूर्ण केली नाही आणि कामही बंद केले नाही. त्यामुळे, त्यांना समजावून धडा शिकवा आणि काम बंद करा. त्यानुसारच आम्ही 6 डिसेंबर रोजी सुधीर सांगळे, प्रतीक घुले यांच्यासह कंपनीत गेलो, अशी माहिती सुदर्शन घुलेने सांगितली. तसेच, यावेळी, कंपनीत वॉचमनला मारहाण केली. तसेच, कुणालाही आतमध्ये येऊ न देण्यासाठी दोन लोक बाहेर ठेवले होते, त्यावेळी सरपंच तेथे आले आणि सरपंच आणि पोरांमध्ये वादावाद झाल्याचे सुदर्शन घुलेनं आपल्या कबुली जबाबात म्हटले आहे. त्यावरुन, हत्याप्रकरणाचा आणि खंडणीप्रकरणाचा संबंध असल्याचे दिसून येते.
हेही वाचा
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार




















