Pune Crime : बसचा वाहक असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार, पुण्यातील एसटी ड्रायव्हरचा जबाब 'एबीपी माझा'च्या हाती
Pune Swargate Bus Depot Rape : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्काराची घटना घडलेल्या त्या बसच्या चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामधून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने त्या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वारगेट ते सोलापूर जाणारी ती बस विनावाहक होती. त्यामुळे आरोपीने त्या तरुणीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्याप फरार आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी एसटीबस (एच 06 BW 0319) स्वारगेट आगारात पोहचली होती. त्यावेळी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपीने हे कृत्य केलं. फलटणला जाणाऱ्या तरुणीला त्याने या बसचा वाहक असल्याचं सांगितलं. या बसमध्ये गेली 15 वर्षे आपण ड्रायव्हर असल्याचं त्याने सांगितलं आणि तो तिला त्या बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्याने त्या तरुणीसोबत गैरकृत्य केलं.
23 सुरक्षारक्षक निलंबित
स्वारगेट बस डेपोत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचं वृत्त एबीपी माझाने दाखवल्यानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कारवाईचा बडगा उगारला. सरनाईकांनी स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षारक्षकांचे तात्काळ निलंबन केलं आहे. त्याचवेळी गुरुवारपासून नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश दिलेत. तसंच डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रकांची चौकशी करून आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत.
परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांवर कारवाईचा निर्णय होणार आहे. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गुरुवारी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलवण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न
सर्वात गर्दीचं बस स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एसटी स्टँड परिसरात पार्क करण्यात आलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने तरुणीवर अत्याचार केला.
या घटनेनंतर आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने स्वारगेट बस स्थानकात आंदोलन केलं. शिवसेना नेते वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या केबीनच्या काचाही फोडल्या. दरम्यान बलात्काराची घटना ताजी असतानाच एबीपी माझाने स्वारगेट स्थानकातलं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आणलं. स्वारगेट स्थानकातील जुन्या बंद पडलेल्या बसमध्ये कंडोम्स, जुन्या साड्या, शर्ट आढळल्यात आहेत. त्यामुळे स्वारगेट स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

