Chhatrapati Sambhaji Nagar: हम राक्षस है साधु के भेष में! बंदुकी, तलवार अन् खंजीर घेऊन सोशल मीडियावर रिल्स, छ. संभाजीनगरमधील नव्या 'आका'चा व्हिडीओ व्हायरल
Chhatrapati Sambhaji Nagar: कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात भर रस्त्यात हातात हत्यारे घेऊन व्हिडिओ तयार करतात. हप्तेखोरी खंडणीसाठी टोळी युद्ध होते पण पोलिसांना याची कोणतीही खबर नसते.

छत्रपती संभाजीनगर: संपूर्ण राज्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालल्याचं चित्र आहे. राज्यातील ठिकठिकाणी गुन्हेगारीच्या, दहशत निर्माण करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. भर चौकात तरूण आणि अल्पवयीन मुलं हातात कोयता आणि बंदुके घेऊन सर्रास कायद्याचे धिंडवडे काढताना दिसत आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बातमी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी आहे. कारण कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात भर रस्त्यात हातात हत्यारे घेऊन व्हिडिओ तयार करतात. हप्तेखोरी खंडणीसाठी टोळी युद्ध होते पण पोलिसांना याची कोणतीही खबर नसते.
अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांच्या टोळीत हप्तेखोरी, खंडणीवरून मुकुंदवाडीच्या झेंडा चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कारण या प्रकरणातील आरोपी विकी हेल्मेट, मुकेश साळवे याचे व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हातात कोयते, चाकू घेऊन हे टोळके शहरातील वेगवेगळ्या भागात भर रस्त्यावर आपले व्हिडिओ बनवतात. पण पोलिसांना याची कोणती खबर नसते. धक्कादायक म्हणजे एका प्रकरणात तर न्यायालयात हातकडीसह रील तयार करून पोस्ट करण्यापर्यंत या गुंडांनी मजल मारली होती.
हातात धारदार शस्त्र घेतलेले व्हिडिओ समोर
अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांच्या टोळीतील आरोपी हे परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी हातात धारदार शस्त्र घेऊन व्हिडिओ काढतात. ते सोशल मिडियावरती शेअर करतात. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुले देखील असल्याचं दिसून येत आहे. अशा गोष्टींकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. हातामध्ये कोयते, चाकू घेऊन नाचतानाचे देखील व्हिडिओ यामध्ये आहेत. तर तोंडामध्ये चाकू पकडून नाचतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. रात्रीच्या वेळी असे व्हिडिओ काढले जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. तरुणाईमध्ये आज सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. लाईक आणि कमेंट किती आल्या त्यावरून आपण किती प्रसिद्ध आहोत हे काही तरुण साध्य करत असतात. सोशल मीडिया गॅंगस्टर म्हणून ओळखले जाणारे या रील्स भाईंनी कमरेला कट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन,इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केली होती. या व्हिडिओमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
काही दिवसांपुर्वी रील्सवाल्या भाईंची शहरात धिंड काढली
छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड परिसरात सोशल मिडिया इंस्टाग्रामवरती धारदार शस्त्र घेऊन रील शूट करणे आणि दहशत पसरवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक करून आख्या शहरात त्याची धिंड काढून समाजमाध्यमांवर भाईगिरीचे व्हिडिओ पोस्ट करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या भाईंना इशारा दिला आहे. पोलिसांनी या गावगुंडांना ताब्यात घेऊन शहरात या हुल्लडबाजांची चांगलीच धिंड काढली आहे. पोलिसांनी त्वरित त्या तरुणांचा शोध घेत इंस्टाग्रामवर त्यांचे रील पाहून त्यांना ताब्यात घेतले.त्यानंतर पोलिसांनी या तरुणांची पाचोड शहरात चौका चौकात धिंड काढली आणि सार्वजनिकपणे त्यांना पोलिस ठाण्यात नेले.

























