मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
कल्याणजवळील आंबिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे केले.
ठाणे : राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसू येत आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असतानाही अत्याचाराच्या घटना घडत आहे. गेल्याच आठवड्यात कल्याणमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली असून कठोरता कठोर शिक्षा व्हावी, म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच, आता कल्याणमध्ये (Kalyan) आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अघोरी विद्येच्या नावाखाली, तिच्या समस्या सोडविण्याच्या नावाने या मुलीसोबत भोंदू बाबाकडून अश्लील चाळे करण्यात आले होते. याबाबत स्वत: मुलीने पोलिसांत (Police) फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.
कल्याणजवळील आंबिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे केले. भोंदू बाबाच्या संतापजनक कृत्याने पीडित मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली. या भोंदू बाबाचे नाव अरविंद जाधव असून खडकपाडा पोलीस ठाण्यात भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मी एका बाबाकडे माझ्या फॅमिली प्रॉब्लेम घेऊन गेले होते, पण त्या बाबाने माझ्याशी घाणेरडे कृत्य केले. मी माझ्या नातेवाईकाला घेऊन बाबाकडे गेले होते. मात्र, बाबाने नातेवाईकाला बाहेर बसायला सांगितले व मला एकटीला खोलीत ते घेऊन गेले. तू खूप प्रॉब्लेममध्ये आहेस, मी तुझी समस्या सोडवतो असे म्हणत बाबाने माझ्या संपूर्ण शरिराला टच केल, प्रायव्हेट पार्टलाही हात लावला, अशी धक्कादायक घटना पीडित मुलीने माध्यमांशी बोलताना सांगितली आहे. दरम्यान, याप्रकरणी आपण पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपी बाबावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, नव्या कायद्यानुसार आपण आरोपीला अटक करु शकत नाही, असे पोलिसांनी म्हटले.
विनयभंगाचा गुन्हा दाखल - वाघचौरे
मुलीच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खडकपाडा पोलिसांकडून आवाहनही करण्यात येत की, महिलांसंदर्भात काहीही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधवा, असे कल्याण-खडकपाडा पोलीस स्टेशनचे वपोनी डॉ.अमरनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे. तसेच, अद्यापपर्यंत दुसरी तक्रार आली नसून दाखल गुन्ह्यानुसार आपण तपास करत असल्याचेही वाघचौरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न