Beed Crime Satish Bhosale: बीडच्या खोक्या भाईला हरीण अन् मोरांच्या शिकारीचा शौक, विरोध करणाऱ्याचे 8 दात पाडले, जबडा मोडला
Satish Bhosale aka Khokya bhai: सतीश भोसले याने दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दिलीप ढाकणे यांच्या तोंडाचा जबडा फ्रॅक्चर

बीड: आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश थोरात उर्फ खोक्या भाईने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. सतीश भोसले (Satish Bhosale) याने दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली होती. सतीश भोसले हा भाजपचा (BJP) पदाधिकारी आहे. प्रचंड पैसा आणि दहशतीच्या जोरावर खोक्या भाईने या परिसरात आपला दबदबा निर्माण केला होता. खोक्या भाईच्या या दहशतीच्या थरारक कहाण्या आता एक-एक करुन बाहेर येत आहेत.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. खोक्याने आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात. याशिवाय डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत. आठ दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला. तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली.
यामध्ये दिलीप ढाकणे (Dilip Dhakne) यांचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला लंगडत चालावे लागत आहे. त्याच्या अंगावर वारही आहेत. दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा 19 फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याचा 'आका' सुरेश धस (Suresh Dhas) हेच आहेत. त्यामुळे पोलिसांना आता आकावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही शिरुर बंद करुन आमरण उपोषणाला बसू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
सतीश भोसलेला अटक कधी?
सतीश भोसले याच्याकडून दिलीप ढाकणे यांना मारहाण होतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर खोक्या भाईला अटक कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. बीड पोलिसांनी खोक्या भाईला अटक करण्यासाठी दोन पथकं स्थापन केली आहेत. सतीश भोसलेचे दोन प्रकारच्या मारहाणीचे व्हीडिओ आहेत. शिरुर पोलीस ठाण्यात सतीश भोसले याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्याला अटक झालेली नाही. मात्र, आम्ही त्याला पकडण्यासाठी दोन पथकं तयार केली आहेत, असे बीड पोलिसांकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा























