विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची संख्या अधिक असल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यात आला आहे. मात्र, कोणाला संधी दिली जाणार? याची मात्र अजून माहिती समोर आलेली नाही.

Leader of the Opposition in the Assembly : विधानसभा निवडणूक पार पाडल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता (Leader of the Opposition in the Assembly) कोण होणार? याचा गुंता अजूनही सुटलेला नाही. विधानसभा विरोधी पक्षनेते पद आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पद या दोन्ही पदांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची संख्या अधिक असल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यात आला आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपदी कोणाला संधी दिली जाणार? याची मात्र अजून माहिती समोर आलेली नाही. या पदासाठी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अजूनही शिवसेना ठाकरे गटाकडून नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.
विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून दावा केला जाणार
दरम्यान विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये सुद्धा चर्चा झालेली नाही. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यास विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून दावा केला जाणार आहे. आजच्या घडीला विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा काँग्रेसकडून दावा केला जाणार आहे.
सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू
या पदासाठी विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पाटील यांच्याकडे विधानपरिषदेतील गटनेते पद आहे. या पदावर त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा जाणे विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता झाला पाहिजे असं मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले की, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचा कालावधी ऑगस्टपर्यंत बाकी असून नव्या सरकारच्या कार्यकाळामध्ये विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असावा अशी काँग्रेसची मागणी असल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यामुळे आता या दोन्ही पदांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने जागा वाटपामध्ये रस्सीखेच झाली होती तसेच या दोन पदांवरून सुद्धा होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या सभागृहात ज्या विरोधी पक्षांची संख्या जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता असतो ही परंपरा असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























